Saturday 22 October 2016

उपासकांना उद्देशून...

घ्या, आता याचं ऐका! हा आम्हाला काय सांगणार? मुख्य म्हणजे अधिकारी आहे का हा या विषयावर बोलण्याचा?

वरील प्रश्न तुमच्या मनात उमटले असतील तर खुशाल समजा तुम्ही उपासक नाही! एक म्हणजे तुम्ही पूर्वग्रह जपलाय; दुसरं, तुमचा अहंकार द्रुढ आहे अजून आणि तिसरं, अमुक एक व्यक्ती अधिकारी आणि तमुक अनाधिकारी असा भेद — सुप्तरूपातील उच्च-नीच भाव शिल्लक उरलाय!! तिन्ही मुद्दे सच्च्या उपासकाला गैरलागू होणारे!!! 

विषयाला हात घालण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. सामान्यतः 'उपासक' म्हटलं कि धार्मिक वृत्तीच्या लोकांशी संबंध जोडला जातो. विषय जरी प्रामुख्याने त्यांच्याशी निगडित असला तरी मला इथे एखाद्या विचाराचे, व्यक्तीचे, तत्वाचे, कलेचे, थोडक्यात सर्वच क्षेत्रातील तथाकथित उपासक अभिप्रेत आहेत. पुन्हा एकवार सांगतो; तथाकथित उपासक. सच्चे उपासक नेहमीच सन्मानास पात्र असतात मग ते कुठल्याही क्षेत्रातील का असेनात. 
                      
माझे अनेक परिचित, नातेवाईक, मित्र आणि स्नेही निरनिराळ्या उपासना अनुसरत असतात. कुणी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलंय, कुणी एखाद्या 'इझम'शी बांधिलकी जपतंय, कुणी कलेची आराधना करतंय तर अन्य कुणी जप, नामस्मरण, पारायण, भजन इत्यादी उपासनामंडळांशी निगडित आहेत. सगळ्यात शेवटच्या श्रेणीत जास्त लोक आहेत म्हणून सुरुवात त्यांच्यापासून करतो. 

कुठले तरी महाराज, बाबा किंवा स्वामी यांची उपासना केल्या जाते. इथे उपास्यांची नावं घेणं अप्रस्तुत आणि अनावश्यकही आहे. 'माझी उपासना करा' असं त्या बिचाऱ्यांनी सांगितल्याचं ऐकिवात नाही. परंतु, तथाकथीत उपासकांच्या उपासनेबद्दल असलेल्या कल्पनांचा मागोवा घेणं अतिप्रस्तुत आणि अत्यावश्यकही आहे.

या उपासकांशी संवाद साधल्यानंतर एक बाब लक्षात येते. ते उपास्याला उच्च श्रेणीत ठेवतात. उपास्याच्या नामाचा जागर करणे, उपास्यानी स्वतः लिहिलेल्या अथवा इतर कुणी उपास्यावर लिहिलेल्या ग्रंथांचे पारायण करणे, स्तुतीकाव्य गाणे, उपास्याचे नाव नोटबुकात लिहिणे, उपास, मौन किंवा अन्य कुठले अनुष्ठान मांडणे इत्यादी मार्गाने त्यांची उपासना सुरु असते. यांत गैर काय? काहीच नाही. इतरांना याचा त्रास होतो का? मुळीच नाही. आणि या तथाकथित उपासकांच्या वागणुकीत मूलगामी परिवर्तन दिसून येते का? उत्तर तुमचे तुम्हीच द्या!!

मला वाटतं, उपासना या शब्दाची मी उप-आसन अशी फोड केल्यास हे उपासक नाराज होणार नाहीत. उपास्याला उच्च आसनावर आणि यांना उप-आसनावर बसवल्यास दूषण देणार नाहीत हे. थोडक्यात उप-आसन ते आसन हा प्रवास म्हणजे उपासना याबद्दल यांचे दुमत असण्याचे कारण नाही.
उपास्याचे सगळे गुण यांच्यामध्ये आल्यास यांना नक्कीच धन्य वाटणार.

यांच्या उपास्यात प्रामुख्याने आढळणारे गुण म्हणजे विवेक, वैराग्य, निर्मोह, अनासक्ती आणि 
अहंकाराचा अभाव. जोवर हे गुण जीवनात येत नाहीत तोवर उपासना साधली असे म्हणता येणार नाही असं म्हणणं यांना नक्कीच अमान्य असणार नाही. 

एकदा एका उपासकाला मी विचारलं, 'तुझ्यासाठी पैसा महत्वाचा कि तुझे महाराज?' 'अर्थातच महाराज,' उपासक उत्तरला. म्हटलं, 'मग चल, कर तुझी सगळी संपत्ती महाराजांच्या नावावर आणि हो फकीर त्यांच्यासारखा.' 'ते कुठे, मी कुठे!' तो म्हणाला पण आता त्याच्या म्हणण्यात जोर नव्हता. म्हटलं, 'पन्नास टक्के तरी त्यांच्या नावे दान कर, निदान पंचवीस टक्के? बरं, इच्छापत्र तर कर कि माझ्यानंतर माझी सगळी संपत्ती महाराजांच्या नावे दान करावी.' तो काही बोलला नाही आणि सगळं काही सांगून गेला. उपासना करत होता तो पण तथाकथित उपासक होता.

पैसा मला महत्वाचा आहे, माझी संपत्ती मी माझ्या वारसाला देईन कुणा महाराजाला नाही असं म्हणण्यात वावगं काय? पण 'सगळं महाराजांचं' असं म्हणणे आणि मनात काही वेगळंच असणे अशी दांभिकता मात्र नसावी. 

मला वाटतं, हे एक सोपं गणित आहे. कुठलेसे बाबा, महाराज, स्वामी किंवा महंत जेवले म्हणून माझं पोट भरणार नाही. त्यांची रेसिपी वाचून देखील भूक भागणार नाही.माझं मला कमवावं लागेल, नीट चावून खावं लागेल आणि पचवावं लागेल तरच ते अंगी लागेल. त्यांच्या पुण्याईवर मी तरणार नाही. त्यांची स्तुती करून काहीच साध्य होणार नाही. ते नाराज मात्र होतील. त्यांच्यातील गुण माझ्यात उतरले आणि माझ्या वागणुकीत प्रगट झाले म्हणजे उपासना साधली. 

तुम्हाला काय वाटतं?                  

अगदी असंच एखादा विचार, व्यक्ती, इझम, कला इत्यादिंच्या तथाकथित उपासनकांबाबत घडतांना दिसतं. आणि मला खात्री आहे अशी अनेक उदाहरणं तुम्हीसुद्धा बघितली असतील.

मला आठवतं, माझ्या एका नोकरीच्या जागी एक डाव्या विचारसरणीचे गृहस्थ दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते (उजव्या विचारसरणीत सगळं आलबेल आहे असं मला सुचवायचं सुद्धा नाही. हे अधिकारी वामपंथी होते इतकंच). आमचे अव्वल अधिकारी मात्र स्वपंथी (!) होते. वाट्टेल तेंव्हा, वाट्टेल त्याच्याशी, वाट्टेल तसे वागावे हा त्यांचा मूलमंत्र होता. अशा परिस्थितीत आमच्यावर कायम होणाऱ्या अन्यायाला हे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी वाचा फोडतील अशी वेडी अशा आम्ही सुरुवातीला बाळगत असू. लवकरच ध्यानात आलं, अव्वल अधिकारी विनाकारण जरी गुरकावले तरी हे शेपूट दोन पायात घालतात आणि ते चालू लागले कि हे दोन्ही हात मागे बांधून निमूटपणे त्यांच्यामागे चालू लागतात!! 

लोक या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याचं 'ज्ञानार्जन' चांगलं आहे असं म्हणत. मला वाटायचं यांचं माहितीअर्जन फक्त चांगलं आहे. यांना थोडं जरी ज्ञान 'झालं' असतं तर बिचाऱ्या मार्क्सला तिलांजली दिली नसती!

मला वाटतं, कुणी किती बुकं वाचली आहेत, कुणाला आदर्श मानतो, किती प्रभावीपणे मत मांडू शकतो इत्यादी बाबी गौण आहेत. ती व्यक्ती कशी वागते यातच तिचा कस लागतो. लोकांना जोखण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे त्यांची वर्तणूक, इतरांसोबत त्यांचा व्यवहार. त्यात खोट असली तर सगळं ज्ञान, सगळी विदत्ता आणि तथाकथित उपासना व्यर्थ आहे. 

तुम्हाला काय वाटतं?