Monday 19 September 2016

प्रगटदिनानिमित्त...!

* शिक्षक: काय अक्कल गहाण टाकली कि काय? तुझ्या वयाचे असतांना संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. 
विद्यार्थी: गुरुजी, तुमच्या वयाचे असतांना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती!

* मुलगा: बाबा, आपला जन्म का झाला?
वडील: अरे, आपण इतरांची मदत करावी म्हणून.
मुलगा: मग इतरांचा जन्म का झाला बाबा? आपल्याकडून मदत करून घ्यायला????

हे किस्से लहानपणीच ऐकल्यामुळे गेली पन्नास वर्षे जगणं सोपं झालंय.
एक म्हणजे विविध क्षेत्रांतील महापुरुषांनी त्या त्या क्षेत्रातील महत्वाची कामे आधीच करून ठेवल्यामुळे करण्यासारखं फारसं काही उरलं नाही!!! शिवाय, त्यांचे असामान्य अनुयायी प्राणपणाने त्यांचा वारसा चालवत असल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या मर्जीप्रमाणे जगता येतं....
कुणा व्यक्तीचा अथवा विचाराचा आदर्श ठेवण्याकडे कल नसल्यामुळे त्या आदर्शासाठी स्वतःला झोकून देणे, वाहून घेणे इत्यादी गोष्टींना आपोआपच तिलांजली मिळालीय. बरं, आदर्शाच्या संकल्पनेला थारा नसल्यामुळे आदर्श निर्माण करण्याचं दडपणदेखील नाहीये. परिणामतः, आपल्या अनुभवांना अनुसरून वाटचाल करण्याची गोडी चाखायला मिळतेय. जे काही उमजतंय, उमलतंय ते आपलं स्वतःच असण्याची मजा औरच आहे.
दुसरं म्हणजे, 'प्रत्येकानं आपली मदत स्वतः करावी' या मताचा असल्यामुळे कुणी मागितल्याशिवाय मदत करण्यचा उत्साह मी दाखवत नाही. मात्र, मागितली-तर-मदत-मिळू-शकते हे सुद्धा न कळण्याच्या स्थितीपर्यंत जर कुणाला लोटण्यात आलं आहे असं दिसलं तर शक्य तेंव्हा शक्य तेवढी मदत करतो आणि करत राहीन.
थोडक्यात, एवढं समजलंय कि जिथे दुसऱ्याचं नाक सुरु होतं तिथे आपलं स्वातंत्र्य संपतं. त्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हे ध्यानात ठेऊन मनाप्रमाणे जगता येतंय. अर्थात, सगळ्यांनाच इतरांना त्रास न देता जगता येईलच याची मात्र खात्री देता येत नाही. पण तो त्रास सहन करावा लागणं जगण्याचाच भाग आहे हे आकळल्यावर तक्रार उरत नाही.
माझ्या प्रगटदिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!