Tuesday 29 August 2017

सलिल

सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते  फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून बोलणं होतं त्यांपैकी तो एक. मी आजवर त्याला भेटलो नाहीये पण भेटायची इच्छा जरूर आहे.  
आमचं बोलणं अर्थातच कामाबद्दल असतं. एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त एक कॉलचा अवधी नसतो. मात्र गेल्या काही दिवसात त्याच्या आवाजात  मला दुःखाची एक झालर जाणवली. मला आठवतं, मी एका कलीगला म्हणालो सुद्धा; सलिल कुठल्यातरी प्रॉबेम मधे आहे बहुदा. शेकडो मैलांवरून नेमकं काय हे मी सांगू शकणार नाही पण काहीतरी खटकतंय मला. 
परवाच बातमी आली-- सलिलने टोकाची कृती केली. सुदैवानं त्याला वाचवता आलं. त्याला ओळखणाऱ्या लोकांसाठी हा मोठा धक्का आहे. तो नेहमी आनंदी दिसायचा. चांगली नौकरी आहे, पैसा-अडक्याची चिंता नाही, व्यसनसुद्धा नाहीये कुठलं आणि स्वभाव मनमिळावू व  इतरांना मदत करण्याचा. त्याच ऑफिस मधे काम करणारा त्याचा एक मित्र आणि माझा सहकारी सांगत होता कि त्याच्या घरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आई-वडील प्रेमळ आहेत. कुठलाही दबाव त्याच्यावर टाकला नाही कधी. त्याच्यासाठी स्थळं शोधणं उत्साहात सुरु आहे. सलिलचा प्रेमभंग देखील झाला नाहीये. थोडक्यात काय तर सगळं जसं असावं अगदी तसं आहे. मग का असं व्हावं?  
आणि मला त्याच्या आवाजात दुःखाची एक झालर जाणवली त्याचं काय? मी जास्त खोलात जाऊन विचारपूस केली नाही हे चुकलं का? घसट नसतांना मी  तसं करणं अपेक्षित आहे का? मी चौकशी केली असती तर ते नाक खुपसणं ठरवल्या गेलं असतं का? आपल्या कामाशी काम ठेवावं असा सर्वमान्य संकेत नाहीये का? सलिलला ज्याच्या जवळ मन मोकळं करावं अशी एकही व्यक्ती मिळू नये हे धक्कादायक नाहीये का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची घटना विरळ आहे का?
या  घटना विरळ असत्या तर खूप छान झालं असतं. दुर्दैवानं वस्तुस्थिती मात्र तशी नाही. वर्तमानपत्राच्या कामासंदर्भात १६ ते २५ या वयोगटातील युवक-युवतींसोबत इंटरॅक्ट करण्याच्या संधी मला सतत मिळत असतात. व्यक्तिगती अनुभवातून मी हे सांगण्याचं धाडस करतो कि तरुणाई संदर्भात धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे. आपण ती ऐकण्यास अक्षम असलो तर दोष आपला आहे.
आपणा सगळ्यांना असे असंख्य पालक माहित असतील जे आपल्या पाल्यांकरता आवाक्यात असलेल्या आणि प्रसंगी आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी आनंदाने करत असतात. कामाचा वाढता व्याप, वेळेच्या मर्यादा, दोन्ही पालकांनी नौकरी करण्याची गरज इत्यादी वर्तमान युगाच्या  'नेसेसरी इव्हिल्स' मुळे पाल्यांना सातत्यानं ठराविक वेळ देणं सगळ्यांना शक्य नसतं. तरीही आपल्या परीनं ते करण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, वीक-एन्ड ला फिरायला नेतो, त्यांची प्रत्येक गरज आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, त्यांचं ऐकून घेतो, त्यांना महत्वाच्या निर्णयात सामील करून घेतो, अगदी एकूण एक गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करतो, त्यांना आमच्यापरीनं सर्वोत्तम शिक्षण आणि राहणीमान मिळावं हे बघतो, आम्ही पालक नाही जणू त्यांचे मित्रच आहोत असे वागतो, आम्ही त्यांच्यासाठी करू शकत असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही करतो... आपण सगळे हे ऐकत असतो. मग का असं व्हावं?  
माझा एक मित्र वाढत्या वयाच्या मुलांचा पालक आहे. त्यानं तर अक्षरशः मानसशात्राचा अभ्यास सुरु केला आहे. भीती, न्यूनगंड, चिंता, नैराश्य अशा विविध मनःस्थितींची त्यानं खोलात जाऊन माहिती मिळवली आहे. मी एकदा त्याला म्हणालो मित्रा, हे सगळं छान आहे पण तुझं ज्ञान आणि इगो थोड्या वेळासाठी बाजूला ठेऊन माझं म्हणणं ऐकशील? बोल, तो म्हणाला. कदाचित मला इग्नोअर करणं त्याला प्रशस्त वाटलं नसावं कारण स्वभावानं प्रेमळ आहे तो.
मी म्हटलं, बाबारे, तू जो अभ्यास केला आहेस आणि जी माहिती मिळवली आहेस ते कौतुकास्पद आहे. जरा आणखी विचार कर. डोक्यानं सगळं काम झालं असतं तर हृदयाची काय गरज होती? पाल्यांसाठी अभ्यास करणं, माहिती मिळवणं व पाल्यांना समजून घेणं, त्यांना सुविधा पुरवणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं मार्गदर्शन करणं अशा अनंत गोष्टी आपण करू शकतो. परंतु ते एक शब्दही बोलले नाहीत तरीही त्यांना काय म्हणायचं आहे हे समजण्यासाठी, त्यांच्या डोळ्यातील भाव टीपण्यासाठी ज्ञान उपयोगाचं नाही. असावं लागतं ते कायम त्यांच्यासाठी धडधडणारं हृदय. मग 'ज्ञान' मुळीच नसलं तरी काम भागतं.              
वरकरणी जरी सगळं आलबेल वाटलं तरी आत खोल कुठेतरी खळबळ माजलेली असू शकते. मला जरा कुणी हे समजावून सांगेल का? सगळ्या गोष्टी अगदी जशा असायला हव्या अगदी असतील तर का कुणी टोकाची कृती करेल? मला खरंच समजत नाही हे. 
कमिंग बॅक टू सलिल, सलिलच्या वडिलांच्या जागी स्वतःला ठेऊन मी असं म्हणेन; मला आत्मपरीक्षण करायला हवं. प्रामाणिकपणे मला वाटतं कि त्याला अशी स्टेप घ्यावी लागावी असं कुठलंही कारण नव्हतं. पण त्यानं ती स्टेप घेतली हि वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. शक्य आहे कि त्याला नेमकं काय वाटतं हे मी कधीच त्याच्या मौनात किंवा डोळ्यात वाचू शकलो नाही. अजून वेळ गेलेली नाही. मला स्वतःच्या आत शोध घेऊ दे; कदाचित मला उत्तर मिळेल... 

Saturday 8 April 2017

कॉलिंग अ स्पेड अ स्पेड

डॉक्टर्स वर उठसुठ तोंडसुख घेण्याचे दिवस आहेत हल्ली. मी काही त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही त्यामुळे हा लेख त्यांच्यासाठी इंजिनिअर्ड आहे असं समजण्याचं कारण नाही. क्रिटिकल केअर देणारे तज्ञ  जनरल प्रॅक्टिशनर्स यांना जवळून पाहण्याची संधी मिळालेला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हे लिहितोय. या लेखाद्वारे मी अनेकांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता आहे परंतु 'जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नही कहूँगा' हि भावना द्रुढ असल्यामुळे आणि स्वानुभवाशिवाय काहीही बोलण्याचा सतत प्रयत्न असल्यामुळे रोषाला मी भीक घालत नाही. 

डॉक्टर्स विरुद्ध लिहिलं-बोललेलं अनंत आहे. ते सगळंच असत्य आहे आणि सगळे डॉक्टर्स हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं मुळात मी म्हणतच नाहीये. पण नाण्याला दोन बाजू असतात आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा पाहिली जावी हा माझा आग्रह निश्चितच दुराग्रह ठरणार नाही. 
      
बऱ्याचदा असं पाहण्यात येतं कि अत्यवस्थ रुग्णाला एखाद्या डॉक्टरकडे नेलं जातं. बरं, त्या बापड्यानं प्रामाणिकपणे असं म्हटलं कि 'माफ करा, मी या स्थितीतल्या रुग्णावर उपचार करण्यास समर्थ नाही. त्यासाठी लागणारी साधनं सुद्धा माझ्याजवळ नाहीत' तरी तो तीव्र टीकेचा धनी होतो. 'एमबीबीएस तर केलंय ना? स्पेशलायझेशन कुठलंही असो; आधीचं सगळं विसरला कि काय? शपथ घेतलीय ना रुग्णसेवेची?' अशीच सर्वमान्य प्रतिक्रिया असते. आणि समजा कर्तव्यबुद्धीनं तो उपचार करण्यास पुढे झाला दुर्दैवानं रोगी दगावला किंवा परिस्थिती आणखीच बिकट झाली तर विचारायलाचं नको. मला सांगा, अशा स्थितीत त्यानं अथवा तिनं काय करावं? तुम्ही काय कराल असे कात्रीत सापडल्यावर? कापलेच जाणार!   

आपल्यापैकी सगळ्यांचेच कुणी ना कुणी परिचित अथवा नातेवाईक सॉफ्टवेअर, खाजगी व्यवसाय, अध्यापन, बँकिंग इत्यादी क्षेत्रांत असणार. एखादा सॉफ्टवेअर/ खाजगी व्यवसायिक खोऱ्यानं पैसा ओढतो तेंव्हा त्याच्या यशाची केव्हढी प्रशंसा होते. बऱ्याचदा तो एखादं प्रॉडक्ट देखील विकत नाही; कन्सेप्ट विकतो. त्यामुळे भांडवल-श्रम-नफा हे त्रैराशिक लागू होत नाही. आयडीएशन या गोंडस संज्ञेखाली सगळं कौतुकास पात्र होतं. 

अशा व्यावसायिकांच्या बाबतीत आपण समाजऋण, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, माणुसकी असले निकष लावण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र डॉक्टर म्हटलं कि हे निकष सर्वप्रथम येतात आणि आणि भांडवल-श्रम-नफा हे त्रैराशिक सोयीनुसार मांडलं जातं. डॉक्टर्ससाठी हि स्टेप-मदरली ट्रीटमेंट नाही का?   

वरील सर्व निकष अर्थातच अत्यंत महत्वाचे आहेत परंतु ते प्रत्येक व्यक्तीला लागू होतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभाव जपतो का, समाजऋण फेडतो का; मित्रांनो, आपण स्वतःला हे विचारायला हवं कि नको?                                               

भांडवल-श्रम-मिळकत हे त्रैराशिक प्राध्यापकांना लागू केल्या जातं का? आठवड्याला काही तास घेण्यासाठी महिन्याला लाखभर रुपये कधीच डोळ्यात खुपत नाहीत. मोजक्या खाजगी संस्था सोडल्या तर प्राध्यापकांना केआरए (की रिझल्ट एरीआझ) नसतात. ते शिकवत असलेले १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण व्हायलाच हवेत, अमुक इतके प्रथम श्रेणीत आणि तमुक तितके डिस्टिंक्शन ग्रेड मधे असावेतच असे निकष नसतात. आपण सरळ म्हणून मोकळे होतो, असं कसं ठरवता येईल? अध्यापन टू-वे प्रोसेस आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि जबाबदारी तितकीच महत्वाची असते. 

डॉक्टर्स साठी मात्र वेगळा न्याय दिसतो. आजारावर मात करण्याच्या प्रक्रियेत रुग्णाचा सहभाग आणि जबाबदारी महत्वाची नाही का? निरोगी होणं वन-वे प्रोसेस कसा होऊ शकतो? त्यासाठी केवळ आणि केवळ डॉक्टरच जबाबदार धरला जाऊ शकतो का? तुम्हीच सांगा दोस्तांनो. 

डीमॉनेटायझेशन नंतर बँकिंग क्षेत्रांत कार्यरत असलेले आपले स्नेही आणि परिचित यांची दशा आठवते ना? एक आठवडा जरी सुटी रद्द झाली तरी किती शारीरिक आणि मानसिक त्रास होतो हे आपण स्वतः अनुभवतो. महिनाभर सुद्धा असं दडपण बाळगायचं म्हटलं तर जीव नकोसा होतो

क्रिटिकल केअर देणारे तज्ञ असं वर्षामागून वर्ष करत असतात, २४X; शब्दशः. दिवस असो, रात्र असो, अपरात्र असो, त्यांचा फोन केंव्हाही खणखणू शकतो. आणि हे दडपण पॉझिटीव्हली आणि प्रसन्न चेहऱ्यानं घ्यायचं असतं. ट्रस्ट मी, सोपं नाहीये. अगदी जनरल प्रॅक्टिशनर्सना सुद्धा खाजगी आयुष्य फारसं नसतं. श्रम आणि श्रमाचा मोबदला हे गणित साधं-सोपं-सरळ उरत नाही. श्रमाचा आर्थिक मोबदला मिळवतांना त्या मोबदल्याची सुद्धा भारी किंमत चुकवावी लागते. 

इन नटशेल, नाण्याच्या दोन्ही बाजू बघूया आपण. 'सगळे डॉक्टर्स संत नसतात' असं विधान करतांना 'सगळे डॉक्टर्स असंत नसतात' हे सुद्धा ध्यानात घ्यायला हवं कि नको? क्षेत्र कुठलंही असो, चांगलं-वाईट असणारच. काही वाईट प्रवृत्तींसाठी अख्ख क्षेत्र वेठीला धरण्याची गरज नाही; क्षेत्र कुठलंही का असेना.        

डॉक्टरपुराण संपवून थोडं आपल्याबद्दल बोलू. 

डॉक्टर्सकडे जावं लागू नये यासाठी आपण प्रोऍक्टिव्हली काही करतो का? 

पोटाचा घेर वाढत असतांना आपण झोपेत असतो का? 

झाली-जळजळ-खा-गोळी, पोट-बिघडलं-खा-गोळी; डोकं दुखतंय, झोप येत नाहीये, मळमळतंय एटसेट्रा एटसेट्रा खा-गोळी - 'पॉप पिल कल्चर' आपण बेशुद्धीत स्वीकारतो का? 

स्वतःच्या शरीरासंबंधात सुद्धा आपण संवेदनशील नाही हे मान्य करण्याऐवजी इतरांच्या संवेदनशीलतेबद्दल लूझली बोलत राहणं योग्य आहे का? 

लेट अस कॉल स्पेड स्पेड...