डॉक्टर्स वर उठसुठ तोंडसुख घेण्याचे दिवस आहेत हल्ली. मी काही त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही त्यामुळे हा लेख त्यांच्यासाठी इंजिनिअर्ड आहे असं समजण्याचं कारण नाही. क्रिटिकल केअर देणारे तज्ञ व जनरल प्रॅक्टिशनर्स यांना जवळून पाहण्याची संधी मिळालेला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हे लिहितोय. या लेखाद्वारे मी अनेकांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता आहे परंतु 'जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नही कहूँगा' हि भावना द्रुढ असल्यामुळे आणि स्वानुभवाशिवाय काहीही न बोलण्याचा सतत प्रयत्न असल्यामुळे रोषाला मी भीक घालत नाही.
डॉक्टर्स विरुद्ध लिहिलं-बोललेलं अनंत आहे. ते सगळंच असत्य आहे आणि सगळे डॉक्टर्स हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं मुळात मी म्हणतच नाहीये. पण नाण्याला दोन बाजू असतात आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा पाहिली जावी हा माझा आग्रह निश्चितच दुराग्रह ठरणार नाही.
बऱ्याचदा असं पाहण्यात येतं कि अत्यवस्थ रुग्णाला एखाद्या डॉक्टरकडे नेलं जातं. बरं, त्या बापड्यानं प्रामाणिकपणे असं म्हटलं कि 'माफ करा, मी या स्थितीतल्या रुग्णावर उपचार करण्यास समर्थ नाही. त्यासाठी लागणारी साधनं सुद्धा माझ्याजवळ नाहीत' तरी तो तीव्र टीकेचा धनी होतो. 'एमबीबीएस तर केलंय ना? स्पेशलायझेशन कुठलंही असो; आधीचं सगळं विसरला कि काय? शपथ घेतलीय ना रुग्णसेवेची?' अशीच सर्वमान्य प्रतिक्रिया असते. आणि समजा कर्तव्यबुद्धीनं तो उपचार करण्यास पुढे झाला व दुर्दैवानं रोगी दगावला किंवा परिस्थिती आणखीच बिकट झाली तर विचारायलाचं नको. मला सांगा, अशा स्थितीत त्यानं अथवा तिनं काय करावं? तुम्ही काय कराल असे कात्रीत सापडल्यावर? कापलेच जाणार!
आपल्यापैकी सगळ्यांचेच कुणी ना कुणी परिचित अथवा नातेवाईक सॉफ्टवेअर, खाजगी व्यवसाय, अध्यापन, बँकिंग इत्यादी क्षेत्रांत असणार. एखादा सॉफ्टवेअर/ खाजगी व्यवसायिक खोऱ्यानं पैसा ओढतो तेंव्हा त्याच्या यशाची केव्हढी प्रशंसा होते. बऱ्याचदा तो एखादं प्रॉडक्ट देखील विकत नाही; कन्सेप्ट विकतो. त्यामुळे भांडवल-श्रम-नफा हे त्रैराशिक लागू होत नाही. आयडीएशन या गोंडस संज्ञेखाली सगळं कौतुकास पात्र होतं.
अशा व्यावसायिकांच्या बाबतीत आपण समाजऋण, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, माणुसकी असले निकष लावण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र डॉक्टर म्हटलं कि हे निकष सर्वप्रथम येतात आणि आणि भांडवल-श्रम-नफा हे त्रैराशिक सोयीनुसार मांडलं जातं. डॉक्टर्ससाठी हि स्टेप-मदरली ट्रीटमेंट नाही का?
वरील सर्व निकष अर्थातच अत्यंत महत्वाचे आहेत परंतु ते प्रत्येक व्यक्तीला लागू होतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभाव जपतो का, समाजऋण फेडतो का; मित्रांनो, आपण स्वतःला हे विचारायला हवं कि नको?
भांडवल-श्रम-मिळकत हे त्रैराशिक प्राध्यापकांना लागू केल्या जातं का? आठवड्याला काही तास घेण्यासाठी महिन्याला लाखभर रुपये कधीच डोळ्यात खुपत नाहीत. मोजक्या खाजगी संस्था सोडल्या तर प्राध्यापकांना केआरए (की रिझल्ट एरीआझ) नसतात. ते शिकवत असलेले १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण व्हायलाच हवेत, अमुक इतके प्रथम श्रेणीत आणि तमुक तितके डिस्टिंक्शन ग्रेड मधे असावेतच असे निकष नसतात. आपण सरळ म्हणून मोकळे होतो, असं कसं ठरवता येईल? अध्यापन टू-वे प्रोसेस आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि जबाबदारी तितकीच महत्वाची असते.
डॉक्टर्स साठी मात्र वेगळा न्याय दिसतो. आजारावर मात करण्याच्या प्रक्रियेत रुग्णाचा सहभाग आणि जबाबदारी महत्वाची नाही का? निरोगी होणं वन-वे प्रोसेस कसा होऊ शकतो? त्यासाठी केवळ आणि केवळ डॉक्टरच जबाबदार धरला जाऊ शकतो का? तुम्हीच सांगा दोस्तांनो.
डीमॉनेटायझेशन नंतर बँकिंग क्षेत्रांत कार्यरत असलेले आपले स्नेही आणि परिचित यांची दशा आठवते ना? एक आठवडा जरी सुटी रद्द झाली तरी किती शारीरिक आणि मानसिक त्रास होतो हे आपण स्वतः अनुभवतो. महिनाभर सुद्धा असं दडपण बाळगायचं म्हटलं तर जीव नकोसा होतो.
क्रिटिकल केअर देणारे तज्ञ असं वर्षामागून वर्ष करत असतात, २४X७; शब्दशः. दिवस असो, रात्र असो, अपरात्र असो, त्यांचा फोन केंव्हाही खणखणू शकतो. आणि हे दडपण पॉझिटीव्हली आणि प्रसन्न चेहऱ्यानं घ्यायचं असतं. ट्रस्ट मी, सोपं नाहीये. अगदी जनरल प्रॅक्टिशनर्सना सुद्धा खाजगी आयुष्य फारसं नसतं. श्रम आणि श्रमाचा मोबदला हे गणित साधं-सोपं-सरळ उरत नाही. श्रमाचा आर्थिक मोबदला मिळवतांना त्या मोबदल्याची सुद्धा भारी किंमत चुकवावी लागते.
इन अ नटशेल, नाण्याच्या दोन्ही बाजू बघूया आपण. 'सगळे डॉक्टर्स संत नसतात' असं विधान करतांना 'सगळे डॉक्टर्स असंत नसतात' हे सुद्धा ध्यानात घ्यायला हवं कि नको? क्षेत्र कुठलंही असो, चांगलं-वाईट असणारच. काही वाईट प्रवृत्तींसाठी अख्ख क्षेत्र वेठीला धरण्याची गरज नाही; क्षेत्र कुठलंही का असेना.
डॉक्टरपुराण संपवून थोडं आपल्याबद्दल बोलू.
डॉक्टर्सकडे जावं लागू नये यासाठी आपण प्रोऍक्टिव्हली काही करतो का?
पोटाचा घेर वाढत असतांना आपण झोपेत असतो का?
झाली-जळजळ-खा-गोळी, पोट-बिघडलं-खा-गोळी; डोकं दुखतंय, झोप येत नाहीये, मळमळतंय एटसेट्रा एटसेट्रा खा-गोळी - 'पॉप अ पिल कल्चर' आपण बेशुद्धीत स्वीकारतो का?
स्वतःच्या शरीरासंबंधात सुद्धा आपण संवेदनशील नाही हे मान्य करण्याऐवजी इतरांच्या संवेदनशीलतेबद्दल लूझली बोलत राहणं योग्य आहे का?
लेट अस कॉल अ स्पेड अ स्पेड...
पहिल्यांदा एखाद्या वैद्यकीय व्यवसायात नसलेल्या व्यक्तीकडून या विषयावर इतकं प्रामाणिकपणे लिहिलं गेलंय. पण याला trp नाही. समाज फक्त उणे दुणे काढण्यात आणि माध्यमांकडून होणाऱ्या एकतर्फी महितीवजा कार्यक्रमांवर विश्वास ठेवण्यात मग्न आहे. असंही बहुसंख्य भारतीयांना ज्ञानाचा आणि श्रमाचा आदर करण्याची सवय नाहीये.
ReplyDeleteVery nice article.🤗
ReplyDeleteआवडलं सर..!��
ReplyDelete