'मी निष्कांचन, निर्धन साधक...' कांचन बाळगण्याचा एक अहंकार असू असतो आणि कांचन त्यागण्याचा एक. 'सोनं आणि माती समान आहे' असं मानणारे सुद्धा 'मी मातीचा त्याग केला आहे' असं अभिमानाने सांगतांना दिसत नाहीत. 'कांचनत्याग केला' हे म्हणतांना आपण जणू हे मान्यच करतो कि कांचन महत्वाचं आहे. आणि जर ते मातीसमान आहे याची शाश्वती असेल तर मग त्याचा त्याग करण्याची गरज काय?
धनाचं असंच आहे. धनी असो अथवा निर्धन, दोघांच्याही द्रुष्टीने धन महत्वाचं आहे. फरक एवढाच कि एक व्यक्ती त्याच्या असण्यात धन्यता मानतेय तर दुसरी त्याच्या नसण्यात.
हा सद्गृहस्थ साधक आहे. काहीतरी साधायचं आहे याला. म्हणजे जे आत्ता आहे त्यापेक्षा वेगळं असणं अपेक्षित आहे. आत्ता जे आहे त्यांत याला संतोष नाहीये. सामान्यतः साधक आस्तिक असतो. परमेश्वरावर त्याचा विश्वास असतो. परमेश्वर सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सर्वशक्तिमान आहे असं साधक मानतो. प्रत्येक स्थितीला परमेश्वराची इच्छा म्हणून मान्य करतो. मात्र सद्यस्थिती केवळ परमेश्वरी इच्छा म्हणून मान्य न करता त्यावर मात करून काहीतरी साधणं याचं उद्दिष्ट दिसतंय. चांगलं आहे. पण मित्रा, धन सुद्धा साधन असू शकतं ना? उदरनिर्वाहाची चिंता नसेल तर साध्यापर्यंत तुझा प्रवास सुकर होऊ शकतो.
'वैराग्याचा एक उपासक' असं हा स्वतःला संबोधतो.
कुणाला नौकरी मिळवायची असते, कुणाला छोकरी मिळवायची असते; याला वैराग्य मिळवायचं आहे. तसं नसेल, तर उपासनेचं प्रयोजन काय? प्रार्थनेचं प्रयोजन काय? प्रार्थना काहीतरी मागण्यासाठी असू शकते किंवा काहीहि न मागण्यासाठी असू शकते. 'काहीही उद्देश नसणं' हा एक उद्देश ठरतोच ना?
बरं, उपासना जीवनापेक्षा भिन्न असू शकते कि जीवनाचा एक भाग असते? 'मी' उपासक आहे, मी उपासना 'करतो' हा भाव इथे प्रबळ आहे. उपासना जगतांना असले विचार मनात येणार नाहीत कारण तेंव्हा उपासना घडेल 'केली' जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं?
पुढे हा म्हणतो 'हिमालयाचा मी तो यात्रिक'...
जणू हिमालयात गेल्याने काही वेगळं घडेल असं याला वाटतंय. मित्रा तू जसा हुबळीला असशील तसाच हिमालयात असणार. अहंकार, अपेक्षा, असंतोष, उद्देश हे सगळं आणि बरंच काही सोबत जाणार तुझ्या. हिमालयाचं वाटोळं करशील तू मित्रा!
'मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम?' असं काय विचारतोस? ते उपजलं नाहीये; ते तुझ्यात सदैव आहेच. तुझा सुप्त अहंकार आणि इतर गोष्टी हेच दर्शवतात. संसाराचा तिरस्कार सांगतो कि संसार तुझ्या मनात खोलवर रुजलेला आहे. का स्वतःला फसवतोस? वैराग्य हि मनाची स्थिती आहे, भौगोलिक नाही हे खरंच कळत नाही तुला?
माफ कर, पण पळपुटा भासतोस तू. निष्कांचन 'मी' आहे, साधक 'मी' आहे, वैराग्याचा उपासक 'मी' आहे, हिमालयाचा यात्रिक 'मी' आहे. सगळं तुझं. पण अपयशाची शक्यता दिसताच त्याची जबाबदारी स्वतः न घेता, अपयशी 'मी' आहे असं न म्हणता 'देवाघरचे ज्ञात कुणाला?' असं म्हणून काल्पनिक देवाला वेठीला धरतोस? चांगलं ते माझं आणि वाईट ते 'देवाची इच्छा'; 'देवाघरचं कुणाला समजावं' हा कुठला न्याय?
किमान परमेश्वरावर दया कर मित्रा...
(टीप: एका गीतावर हा लेख आधारित असला तरी त्या गीतावर हे भाष्य नाही)
No comments:
Post a Comment