Friday, 9 December 2016

असेही करोडपती...

परवा फेसबुक वर एका 'अध्यात्मिक' व्यक्तीचं पोस्ट वाचनात आलं. काही समविचारी लोकांनी मिळून अमुक कोटी जपसंख्या तमुक कालावधीत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. त्यांच्या गुरुसाठी त्यांच्या असलेल्या 'भक्तीची' ते मोजदाद ठेवतात! हे सुद्धा स्पष्ट आहे कि त्यांनी एक टार्गेट मनात ठरवलं होतं. अन्यथा तमुक कालावधीत जप पूर्ण केल्याचा उल्लेख असण्याचे कारण काय? बरं, सूक्ष्मस्वरूपात अहंकाराला कुरवाळणं सुरूच होतं. 'आम्ही' जपसंख्या ठराविक कालावधीत साध्य केलीय! आणि हे 'अध्यात्मिक' म्हणतात स्वतःला!!
एका गोष्टीची मात्र खात्री बाळगता येईल. समजा या लोकांनी कुणाला असं म्हणतांना ऐकलं कि अमुक वर्षात तमुक करोड रुपये कमावणं माझं ध्येय आहे तर यांच्या नजरेत तुम्हाला 'काय माणूस आहे हा!' असा भाव जाणवेल. एखादा ख्यातनाम कलाकार अथवा प्रसिद्ध खेळाडू आपल्या समाजकार्याबद्दल भरभरून बोलत असतांना यांच्या चेहेऱ्यावरचे भाव बघा. कुणी एक पालक आपल्या पाल्याला सांगत असेल, ''नव्वद पेक्षा एक टक्काही कमी चालणार नाही परीक्षेत' तेंव्हा यांची प्रतिक्रिया पहा.
बरोबर आहात तुम्ही. 'पैश्यामागे धावणाऱ्या' माणसाला हे विचारतील, ''आयुष्य यासाठी आहे का? पैसा स्वास्थ्य, समाधान आणि आनंद विकत घेऊ शकतो?'' त्या 'बढाईखोर' कलाकार किंवा खेळाडूला हे न मागता मोलाचा सल्ला देतील, ''आपण केलेल्या दानाबद्दल बोलू नये. उजव्या हातानं दिलं तर डाव्या हातालाही कळू नये.'' आणि पालकांना यांचा उपदेश असेल, ''अरे, का मुलांना स्पर्धा शिकवता? टक्केवारी म्हणजे अंतस्थ गुणांची अभिव्यक्ती नसते.''
मला दुरान्वयाने सुद्धा असं सुचवायचं नाहीये कि पैसा स्वास्थ्य, समाधान आणि आनंद विकत घेऊ शकतो, स्वतःही बढाई करावी आणि मुलांना स्पर्धा शिकवावी!! प्रत्येकाला जाणवत असतं काय योग्य आणि काय अयोग्य. माझा माझ्या 'जप करोडपती' मित्रांना एक साधा प्रश्न आहे; मित्रांनो खरंच स्वतःच्या आत डोकावता तुम्ही?
मित्रांनो, हे तुमच्यासाठी.
'पैश्यामागे धावणाऱ्या' व्यक्तीला बोल लावण्यापूर्वी एकदा असा विचार करा ना. मोजणी तुम्हाला तरी चुकलीय का? ती व्यक्ती मिळवलेला पैसा मोजतेय आणि तुम्ही केलेला जप मोजताय एवढाच काय तो फरक. संख्या दोघांनाही महत्वाची आहे. ती व्यक्ती काही वर्षांचं उद्दिष्ट बाळगून आहे आणि तुम्ही सप्ताह अथवा चातुर्मासाचं. ध्येय तिलाही गाठायचंय आणि तुम्हालाही.
तो कलाकार किंवा खेळाडू तरी चुकीचं वागतोय का? त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचे असंख्य चाहते प्रेरणा घेऊ शकतात आणि ते चांगलंच आहे नाही का? आणि मित्रांनो तुमचं काय? तुम्हीसुद्धा बढाई मारताच आहात एकप्रकारे. प्रामाणिक उत्तर द्या, प्लिज.
आणि त्या पालकांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात मित्रांनो? तुमच्या जपाची 'टक्केवारी' काही कारणास्तव घसरली तर त्रास होतोच ना तुम्हाला?
मार्क झकरबर्ग याला त्याच्या एका टाऊन हॉल दरम्यान विचारल्या गेलेल्या प्रश्नाची इथे प्रकर्षाने आठवण होतेय. प्रश्न असा होता: तुम्ही दिवसात किती तास काम करता? मार्कचं उत्तर ढोबळपणे असं होतं: कामाची तुमची व्याख्या काय आहे यावर उत्तर अवलंबून आहे. कामाच्या जागी बसून काम करणं तुम्हाला अभिप्रेत असेल तर मी दररोज सुमारे १२ ते १५ तास काम करतो. काम म्हणजे सातत्याने विचार करणे, कल्पकता, नावीन्य, कालपेक्षा आज चांगला असण्याची जिद्द असा तुमचा अर्थ असेल तर मी कामाशिवाय काहीच करत नाही आणि काम म्हणजे आनंद असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मी कामच करत नाही. माझ्यादृष्टीने हे काम आणि हा विरंगुळा असा भेदच नाहीये.
व्यवसाय, अध्यात्म, क्रिकेट, गायन किंवा अन्य क्षेत्र असेना, जे आपण करतोय त्यात आनंद मिळणं महत्वाचं. रुपये, जप, रन्स अथवा अमुक इतक्या रागांवर प्रभुत्व यांची चर्चा कशाला? इतरांना त्याचं महत्व वाटूही शकेल पण माझ्या अध्यात्मिक मित्रांनो, तुम्ही मात्र यापासून दूर असावं हेच अपेक्षित आणि उचितही आहे.
संख्येच्या मर्यादा दूर न सारता अमर्यादाला जाणता येतं? तुम्हाला काय वाटतं?