सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून बोलणं होतं त्यांपैकी तो एक. मी आजवर त्याला भेटलो नाहीये पण भेटायची इच्छा जरूर आहे.
आमचं बोलणं अर्थातच कामाबद्दल असतं. एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त एक कॉलचा अवधी नसतो. मात्र गेल्या काही दिवसात त्याच्या आवाजात मला दुःखाची एक झालर जाणवली. मला आठवतं, मी एका कलीगला म्हणालो सुद्धा; सलिल कुठल्यातरी प्रॉबेम मधे आहे बहुदा. शेकडो मैलांवरून नेमकं काय हे मी सांगू शकणार नाही पण काहीतरी खटकतंय मला.
परवाच बातमी आली-- सलिलने टोकाची कृती केली. सुदैवानं त्याला वाचवता आलं. त्याला ओळखणाऱ्या लोकांसाठी हा मोठा धक्का आहे. तो नेहमी आनंदी दिसायचा. चांगली नौकरी आहे, पैसा-अडक्याची चिंता नाही, व्यसनसुद्धा नाहीये कुठलं आणि स्वभाव मनमिळावू व इतरांना मदत करण्याचा. त्याच ऑफिस मधे काम करणारा त्याचा एक मित्र आणि माझा सहकारी सांगत होता कि त्याच्या घरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आई-वडील प्रेमळ आहेत. कुठलाही दबाव त्याच्यावर टाकला नाही कधी. त्याच्यासाठी स्थळं शोधणं उत्साहात सुरु आहे. सलिलचा प्रेमभंग देखील झाला नाहीये. थोडक्यात काय तर सगळं जसं असावं अगदी तसं आहे. मग का असं व्हावं?
आणि मला त्याच्या आवाजात दुःखाची एक झालर जाणवली त्याचं काय? मी जास्त खोलात जाऊन विचारपूस केली नाही हे चुकलं का? घसट नसतांना मी तसं करणं अपेक्षित आहे का? मी चौकशी केली असती तर ते नाक खुपसणं ठरवल्या गेलं असतं का? आपल्या कामाशी काम ठेवावं असा सर्वमान्य संकेत नाहीये का? सलिलला ज्याच्या जवळ मन मोकळं करावं अशी एकही व्यक्ती मिळू नये हे धक्कादायक नाहीये का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची घटना विरळ आहे का?
या घटना विरळ असत्या तर खूप छान झालं असतं. दुर्दैवानं वस्तुस्थिती मात्र तशी नाही. वर्तमानपत्राच्या कामासंदर्भात १६ ते २५ या वयोगटातील युवक-युवतींसोबत इंटरॅक्ट करण्याच्या संधी मला सतत मिळत असतात. व्यक्तिगती अनुभवातून मी हे सांगण्याचं धाडस करतो कि तरुणाई संदर्भात धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे. आपण ती ऐकण्यास अक्षम असलो तर दोष आपला आहे.
आपणा सगळ्यांना असे असंख्य पालक माहित असतील जे आपल्या पाल्यांकरता आवाक्यात असलेल्या आणि प्रसंगी आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी आनंदाने करत असतात. कामाचा वाढता व्याप, वेळेच्या मर्यादा, दोन्ही पालकांनी नौकरी करण्याची गरज इत्यादी वर्तमान युगाच्या 'नेसेसरी इव्हिल्स' मुळे पाल्यांना सातत्यानं ठराविक वेळ देणं सगळ्यांना शक्य नसतं. तरीही आपल्या परीनं ते करण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, वीक-एन्ड ला फिरायला नेतो, त्यांची प्रत्येक गरज आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, त्यांचं ऐकून घेतो, त्यांना महत्वाच्या निर्णयात सामील करून घेतो, अगदी एकूण एक गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करतो, त्यांना आमच्यापरीनं सर्वोत्तम शिक्षण आणि राहणीमान मिळावं हे बघतो, आम्ही पालक नाही जणू त्यांचे मित्रच आहोत असे वागतो, आम्ही त्यांच्यासाठी करू शकत असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही करतो... आपण सगळे हे ऐकत असतो. मग का असं व्हावं?
माझा एक मित्र वाढत्या वयाच्या मुलांचा पालक आहे. त्यानं तर अक्षरशः मानसशात्राचा अभ्यास सुरु केला आहे. भीती, न्यूनगंड, चिंता, नैराश्य अशा विविध मनःस्थितींची त्यानं खोलात जाऊन माहिती मिळवली आहे. मी एकदा त्याला म्हणालो मित्रा, हे सगळं छान आहे पण तुझं ज्ञान आणि इगो थोड्या वेळासाठी बाजूला ठेऊन माझं म्हणणं ऐकशील? बोल, तो म्हणाला. कदाचित मला इग्नोअर करणं त्याला प्रशस्त वाटलं नसावं कारण स्वभावानं प्रेमळ आहे तो.
मी म्हटलं, बाबारे, तू जो अभ्यास केला आहेस आणि जी माहिती मिळवली आहेस ते कौतुकास्पद आहे. जरा आणखी विचार कर. डोक्यानं सगळं काम झालं असतं तर हृदयाची काय गरज होती? पाल्यांसाठी अभ्यास करणं, माहिती मिळवणं व पाल्यांना समजून घेणं, त्यांना सुविधा पुरवणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं मार्गदर्शन करणं अशा अनंत गोष्टी आपण करू शकतो. परंतु ते एक शब्दही बोलले नाहीत तरीही त्यांना काय म्हणायचं आहे हे समजण्यासाठी, त्यांच्या डोळ्यातील भाव टीपण्यासाठी ज्ञान उपयोगाचं नाही. असावं लागतं ते कायम त्यांच्यासाठी धडधडणारं हृदय. मग 'ज्ञान' मुळीच नसलं तरी काम भागतं.
वरकरणी जरी सगळं आलबेल वाटलं तरी आत खोल कुठेतरी खळबळ माजलेली असू शकते. मला जरा कुणी हे समजावून सांगेल का? सगळ्या गोष्टी अगदी जशा असायला हव्या अगदी असतील तर का कुणी टोकाची कृती करेल? मला खरंच समजत नाही हे.
कमिंग बॅक टू सलिल, सलिलच्या वडिलांच्या जागी स्वतःला ठेऊन मी असं म्हणेन; मला आत्मपरीक्षण करायला हवं. प्रामाणिकपणे मला वाटतं कि त्याला अशी स्टेप घ्यावी लागावी असं कुठलंही कारण नव्हतं. पण त्यानं ती स्टेप घेतली हि वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. शक्य आहे कि त्याला नेमकं काय वाटतं हे मी कधीच त्याच्या मौनात किंवा डोळ्यात वाचू शकलो नाही. अजून वेळ गेलेली नाही. मला स्वतःच्या आत शोध घेऊ दे; कदाचित मला उत्तर मिळेल...