'मी प्रेग्नंट नाहीये मग गर्भसंगीत ऐकलेलं चालेल का?' एका युवतीनं विचारलेल्या या निरागस प्रश्नाचा उल्लेख उपस्थितांमध्ये हास्य पेरुन गेला. मनशक्ती
प्रयोगकेन्द्र, लोणावळा तर्फे पुणे येथे आयोजित संस्कारसाहित्य प्रकाशन समारंभात केंद्राचे श्री गजानन केळकर यांनी ही आठवण सांगितली. ज्येष्ठ संगीतकार श्री अशोक पत्की
यांच्या हस्ते गर्भसंगीत सीडीचं प्रकाशन झालं.
वैज्ञानिकांचा
एक मोठा वर्ग गर्भसंस्कार या संकल्पनेचा पुरस्कार करताना दिसतो. इथे आपल्याला त्यामागील वैज्ञानिक तपशिलाचा उहापोह करायचा नाहीये. ते आपलं क्षेत्रही नाही. या विषयातील
चांगला भाव आपल्या जीवनात आणून जीवन जास्त जिवंत करणं एवढाच उद्देश आहे या
चर्चेमागे.
गर्भसंस्कार ही संकल्पना सर्वप्रथम ज्या व्यक्तीनं मांडली तिच्यावर 'गर्भसंस्कार' झाले नव्हते हे उघड आहे. एकदा एका इंग्रजीच्या विद्वानाला विचारण्यात आलं, ''तुम्ही शेक्सपीअर वाचला आहे का?'' त्यानं शेक्सपीअर वाचला नाहीये या माहितीच्या आधारावर त्याला कोंडीत पकडण्याचा
तो एक प्रयत्न होता. गालातल्या गालात हसत विद्वान उत्तरला, ''शेक्सपीअरनं तरी कुठे शेक्सपीअर वाचला होता?''
खरं नाहीये का? ज्ञानेश्वरी वाचणारा ती जगेलच असं नाही आणि 'ज्ञानेश्वरी' जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं ती वाचली असेलंच असंही नाही. केवळ शब्द वाचून काय हशील? त्या शब्दांमधील मोकळ्या जागेत दडलेला अर्थ
टिपता यायला हवा. आणि द्रुष्टी योग्य असेल तर तो अर्थ केवळ शब्दांमधील मोकळ्या जागेतच
कशाला, कुठेही दिसू शकतो. अर्थ जाणून घेऊन योग्यप्रकारे जगणं महत्वाचं. मला वाटतं, संस्कारांबद्दल बोलताना सुद्धा त्यांचं जन्मपूर्व, जन्मोत्तर किंवा आणखी काही असं कुठलंही वर्गीकरण न करता आपण बोलायला हवं.
योग्य संस्कार होणं केंव्हाही महत्वाचं. तुम्हाला काय वाटतं?
सुरुवातीला
उल्लेख केलेल्या युवतीचा भाबडा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही. प्रेग्नंट असताना गर्भसंगीत ऐकणं गर्भाच्या भावविश्वाला पोषक आहे यात शंका नाही पण प्रेग्नंट नसताना ते ऐकण्याचा तोटाही नाही किंवा
त्यामुळे गर्भधारणेची शक्यताही नाही!! तिच्या प्रश्नापलीकडे जाऊन या विषयाचा विचार करुया.
सामान्यतः
नवीन अस्तित्वाची चाहूल लागल्यावरच 'जन्मपूर्व' संस्कारांचा विचार होऊ लागतो. वास्तविक पाहता अस्तित्व गर्भधारणेच्या क्षणालाच सुरु झालेलं असतं. त्यामुळे तो कन्सेप्शनचा क्षण किती जागृत आणि जागरुक होता हे महत्वाचं ठरतं. ती जागृती आणि
जागरुकता त्या महत्वाच्या क्षणी आपल्यात होती का? तो केवळ 'अपघात' तर नव्हता ना? या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्याला द्यायची असतात, ज्याची त्याला माहीतही असतात. तिसरा कुणी त्याबद्दल बोलू शकत नाही, किंबहुना इतर कुणी त्यावर बोलूही नये.
मला वाटतं ज्यांना
आपल्यामार्फत जीवन पुढे न्यायचं आहे त्या सगळ्यांनी 'तो' क्षण जाणीवपूर्वक जगायलाच हवा कारण की तो क्षण फक्त त्यांचाच नसून जन्माला येणारी व्यक्ती सुद्धा त्या क्षणाशी निगडीत असते. शारीरिक आणि मानसिक दृष्टया
शक्य तेवढया उत्तम अवस्थेत असताना केलेलं स्वागत येऊ घातलेल्या अस्तित्वाला निश्चितच सुखावणारं असेल.
आता हे घडावं कसं? वस्तुस्थिती तर अशी आहे की जीवनावर आपण सत्ता गाजवू शकत नाही. कन्सेप्शनचा क्षण नेमका केंव्हा येईल हे विज्ञानाच्या मदतीनेदेखील आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आपण त्या क्षणाला खेचून आणू शकत नाही; तो येतो त्याच्या मर्जीने. पण त्याला बोलावणं धाडलंय हे माहित असल्यावर त्याच्या आगमनासाठी आपण तन-मन-धनाने (हल्ली
खर्चही वाढलाय, म्हणून धनाने!) तयार मात्र राहू शकतो. ती तयारी एकाएकी होणं असंभव आहे. आपल्या जीवनशैलीत, विचारात तात्पुरता बदल करणं दिलासा देऊन जाईल कदाचित पण अपेक्षित फळ देइलच असं नाही. सुसंस्कार जीवनाचा अविभाज्य भाग झाला तरच हवं ते पदरी
पडू शकेल अन्यथा नाही. तुम्हाला काय वाटतं?
संस्कार
करणं-- जन्मपूर्व असोत किंवा जन्मोत्तर-- म्हणजे रोप लावून ते वाढवण्यासारखं असतं. लावलेल्या रोपाभोवती अळं करणं, त्याला पाणी घालणं, त्याची निगा राखणं, गरज असल्यास खत देणं इत्यादी आपल्या हातात असतं. रोप वाढतं मात्र स्वतःच. आपण जे देतो त्यातलं घ्यायचं काय, केंव्हा आणि किती प्रमाणात हे रोप ठरवतं, निसर्ग ठरवतो. तिथे आपली मात्रा चालत नाही.
व्यक्तिमत्वाबद्दल
बोलताना या सगळ्या प्रक्रियेला एक नवीन आयाम प्राप्त होतो, मन आणि बुद्धीचा. लावलेलं रोप बिचारं त्याच्या गरजा पूर्ण झाल्या की
आणखी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. आपण आपल्या आयुष्यात वागतो कशा पद्धतीनं, बोलतो कसं, खातो काय याचं त्याला सोयर-सुतक नसतं. रोप अनुकरण करण्यासाठी
उत्सुक नसतं. मानवी जीवन मात्र अनुकरणशील असल्यामुळे संस्कार देण्याचा विचार करण्यापूर्वी आपल्याला स्वतः संस्कारीत होण्याची गरज असते. कुणी आपला धडा गिरवावा असं वाटत
असेल तर आपल्याल्या आधी धडा घालून द्यावा लागतो.
एक गोष्ट ऐकली
असेल तुम्ही सगळ्यांनी. गोड खाण्याची सवय असलेल्या
मुलाची; गोडाची आवड असणारा साधू, त्याचं मुलाला उपदेश करण्यापूर्वी स्वतः गोड खाणं सोडणं, मुलानं त्याचं ऐकणं इत्यादी. स्वतःमध्येच शिस्त, अनुशासन, योग्य आहारशैली व जीवनशैली यांचा अभाव असेल तर इतरांना काय
सांगणार? ही गोष्ट माहित असून काहीच फायदा नाही; ती जगण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काय वाटतं?
आणखी एक
महत्वाची बाब संस्कारांच्या बाबतीत लक्षात घेणं आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात असं
व्हायला नको की संस्कार देण्याऐवजी आपण ते लादतोय! प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत स्वतःची ब्ल्यू-प्रिन्ट घेऊन जन्माला येत असते हे विसरता कामा नये. कुठल्याही जीवनात ढवळा-ढवळ करण्याचा आपल्याला अधिकार नसतो.
कुठं थांबायचं याचं भान आपल्याला सतत राखावं लागेल. जिब्रान म्हणतो तसं मुलांना प्रेम द्या पण विचार देऊ नका. आपले विचार ते स्वतः घडवतील त्यांच्या पद्धतीनं.
मला वाटतं, प्रत्येकानं फक्त एवढं करावं; जे इतरांनी व्हावं असं वाटतं ते आधी स्वतः
व्हावं. मी प्रामाणिक प्रयत्न करतोय त्या दिशेने. जरुर सांगा, तुम्हाला काय वाटतं?
माझा पत्ता: chandravel.foundation@gmail.com
- चंद्रशेखर वेलणकर
================
जाता जाता…
Your children are not your children.
They are the sons and daughters of life's longing for itself.
They come through you but not from you.
And though they are with you yet they
belong not to you.
You may give them your love but not your
thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their
souls,
For their souls dwell in the house of
tomorrow,
which you cannot visit, not even in your
dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with
yesterday.