Saturday, 15 October 2016

आपला तो बाब्या...

परवा एका आघाडीच्या समाजसेवकाला स्वतःच्या वाटचालीबद्दल बोलतांना ऐकलं. नाव नमूद करून त्या व्यक्तीला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.   

महोदय स्वतःचे  'नेमस्त जीवन' आणि 'समाजहितासाठी' त्यांनी केलेला 'त्याग' यांबद्दल भरभरून बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकतांना कायम जाणवत होतं कि महाशयांनी इतरांच्या भल्यासाठी त्याग केलेल्या प्रत्येक पैशाची आणि गोष्टीची अगदी व्यवस्थित नोंद ठेवलेली आहे! अन्यथा वारंवार त्याचा उल्लेख येण्याचे प्रयोजन काय?         

अनेकदा आपण सद्-गुणांच्या तथाकथित रक्षकांना 'जडवादी' लोकांबद्दल तुच्छतेनं बोलतांना ऐकत असतो . प्रत्येकवेळी याबद्दल ते स्पष्टपणे बोलतीलच असंही नाही. असे स्वघोषित महानुभाव निराळीच क्लुप्ती लढवतात. ते स्वतःच्या कार्याबद्दल अशाप्रकारे बोलतात कि ऐकणाऱ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण व्हावावाटावं, किती मोठं काम आहे यांचं. आणि आपण? आपण तर काहीच करत नाही. यांच्या पासंगालाही पुरणार नाही. खरच महान व्यक्ती आहे! ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आदर ओथंबून वाहायला लागला कि हे मनोमन सुखावत असतील!! 

'पैश्याला सर्वस्व मानणाऱ्या' पामरांचा उद्धार करणं हे या महानुभावांचं जणू जीवनकार्यच असतं. अशा व्यक्तींना झोडपून काढण्याची एकही संधी हे दवडत नाहीत. आणि ह्यांचं गाऱ्हाणं काय असतं? 'पैश्याला एवढं महत्व कुणी कसं देऊ शकतो? मान्य आहे, जगण्यासाठी पैसा लागतो. पण तेवढंच त्याचं महत्व. पैशामागे धावण्याची गरज काय? आणि जन्मभर त्याचाच ध्यास  धरणं शहाणपणाचं आहे का? जर फक्त बँकेचं खातंच फुगणार असेल, तर पैशाची मोजदाद करण्याला काय अर्थ आहे? अरे, नुसता जमावण्यापेक्षा तो पैसा लोकांच्या भल्यासाठी खर्च करा.' कानांना गोड वाटतं ऐकतांना.                       

पैसा जीवनात कोणत्या मर्यादेपर्यंत महत्वाचा असावा याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ खचितच यावी कि अर्थार्जनापलीकडे जाऊन जीवनाला खऱ्या अर्थानं श्रीमंत करणाऱ्या  सार्थक बाबींत रस निर्माण व्हावा हे सगळ्यांनाच मान्य असणारज्यावेळी इतरांच्या गरजांना आपण स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्व देतो त्यावेळी मिळणारा आनंद अवर्णनीय असतो हे आपणा सगळ्यांच्याच अनुभवाचं आहे.    

पैसा महत्वाचा असणाऱ्या लोकांना प्रत्येकवेळी कमी लेखण्याची गरज नसतेपैशाची मोजदाद ठेवणं आणि केलेल्या त्यागाचा हिशोब ठेवणं यांत वस्तुतः काहीही फरक नाही आणि त्यामुळे आपला-तो -बाब्या-आणि-दुसऱ्याचा-तो -कार्टा असा द्रुष्टिकोन ठेवणं योग्य ठरत नाहीदोघेही आपापल्या जागी उचितच आहेत. हिशोब जर दोघांनाही चुकला नसेल तर याचा सन्मान आणि त्याचा असन्मान हा  भेदभाव नको.         

सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कुणी हिशोबा पलीकडे असलेल्या दुनियेत गेलाच — मग तो हिशोब पैशाचा असो कि त्यागाचा असो कि नामस्मरणाचा असो  कि आणखी कशाचा असो — तर ती  व्यक्ती सन्मान, असन्मान असल्या कल्पनांना भीक घालणार नाही.     


तुम्हाला काय वाटतं?​​

No comments:

Post a Comment