Sunday 21 September 2014

पहिलं पाऊल



​​नमनाला घडाभर नाही पण पळीभर तेल तुमच्या परवानगीने ओततो, कारण संवाद अपेक्षीत आहे मला. 'तुम्हाला काय वाटतं?' असं विचारणारी ही व्यक्ती कोण? आणि संवाद तरी कशासाठी? तुमच्या मनात साहजिकच हे प्रश्न उमटले असतील. त्यांची उत्तरे देऊन संवादाची वात तेवत ठेवावी एवढाच या पळीभर तेलाचा उद्देश.

माझा जन्म आणि शिक्षण नागपूर येथे आणि आता बस्तान पुण्यात. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर नियतीला मी 'सज्ञान' झाल्याची खात्री पटली असावी कारण आईची जबाबदारी माझ्यावर टाकून तिने वडिलांना परत बोलावलं. नंतर दोनच वर्षांनी मी व्यवसायाला  लागलो. माझ्या व्यावसायिक जीवनात अनेक टप्पे आले. सुरवात विद्युत अभियंता म्हणून आणि त्यानंतरचा प्रवास विद्युत सल्लागार, इंग्रजीचा शिक्षक, लेखक, पत्रकार, योग शिक्षक आणि 'लाईफ ट्रेनर' पर्यंतचा. शेवटचा शब्द जाणीवपूर्वक इंग्रजीत लिहिला आहे. 'लाईफ ट्रेनर' चे मराठी भाषांतर केले तर पु लं च्या भाषेत सांगायचे म्हणजे उगाचच सशानी आपल्या छातीला गंडस्थळ म्हटल्यासारखं वाटतं!

मला 'ओळखणाऱ्या' अनेकांना माझ्या एकूण प्रवासात सुसंगती दिसत नाही. सातत्य नसल्याचा होणारा आरोप आता ओळखीचा झालाय मला. मी तो कधीच मनावर घेतला नाही हा भाग वेगळा. दोन कारणं आहेत त्याला. एक म्हणजे कालचा 'मी' आज अनेक प्रकारे नव्याने असतो आणि या नव्या 'मी' ला नवी वाट खुणावत असते. दुसरं असं की 'नेमस्तपणा हा गाढवांचा गुणधर्म आहे' असं मला वाटतं!

प्रवाहासोबत वाहण्याची इच्छाच झाली नाही कधी. लग्न करायचचं नव्हतं. शेवटी एक मुलगी भेटली. तिलाही लग्न करायचं नव्हतं! माझ्यासारखाच तिचा प्रवास सुध्दा  'असुसंगत'. पत्रकार, लेखिका, अनुवादक आणि आता काउन्सेलर. आणखी एक साम्य होतं. ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना आपल्या कुवतीनुसार मदत करावी असं दोघांनाही तीव्रतेने वाटत होतं. 'लिव्ह-इन' चा विचार केला. पण त्यामुळे विनाकारण प्रतिरोध निर्माण होणार होता. तो कमी करण्यात वेळ आणि शक्ती घालवण्यापेक्षा आमच्या ध्येयाकरता त्या बहुमोल गोष्टी वापरणं आम्हाला श्रेयस्कर वाटलं. धोपटमार्गानी जायचं नसल्यामुळे मुला-बाळांचा प्रश्न नव्हता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपल्यापरीने जे जे चांगलं करता येईल ते ते करायचं इतकच आम्ही ठरवलं आणि एकत्र प्रवास सुरु केला. सुदैवाने, इथं माझं असातत्य आड न आल्यानं आज दहा वर्षे आम्ही एकत्र आहोत.  

एकत्र राहणं आणि 'नवरा-बायको' नसणं फायद्याचं असतं. आधी उल्लेख केलेल्या दोन गोष्टींशिवाय गाणं, खाणं आणि टेनीस या आमच्या समान आवडी. बस. तिला वाचनाची प्रचंड आवड, मला अत्यंत नावड; मला व्यायामाची खूप आवड, तिला पराकोटीची नावड; ती लोकाभिमुख आणि मी अंतर्मुख. ती तिचं काम करते, मी माझं. एकमेकांची वाट ओलांडण्याची वेळच येत नाही. खरं सांगतो, मित्र म्हणून एकत्र असणं छान. तात्पर्य काय, शक्यतोवर 'नवरा-बायको'​ होऊ नका तुम्हीही.​
        
नागपूरला असताना एका क्षणी जाणवलं की कामाला हवी तशी गती मिळत नाहीए. आपण एका वर्तुळात फिरतोय, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर कुंठीत होतोय याची जाणीव झाली. नवी आव्हानं आपल्याला नवा जोम आणि चेतना देतात. आव्हानांचं वर्तुळ पूर्ण व्हायला नको कारण मग त्यांची सवय व्हायला लागते आणि आव्हान संपतं. शेवटी २००७ साली आम्ही पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. नवी जागा, नवी आव्हानं, नवा संघर्ष, नवा जोम, नवा उत्साह. 

पुण्यात कामाला गती आली आणि विस्तारही मिळाला. व्यावसायिक पातळीवर सुद्धा स्थैर्य आलं असं वाटत असतांना अघटित घडलं. 'कुठल्याही क्षणी काहीही घडु शकतं', 'एकच गोष्ट निश्चीत असते, ती म्हणजे अनिश्चीतता', 'मरण केव्हाही दारात उभं राहतं' इत्यादि आपण नेहमीच ऐकत असतो. अनुभवतो असं म्हणता येणार  नाही. पण ऐकणं आणि अनुभवणं यातला नेमका फरक वर्षभरापुर्वी लक्षात आला.

 
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या एका गुरुवारी आम्ही दोघं एका संध्याकाळी निवांत बोलत बसलो होतो. त्याच आठवडयाच्या रविवारी ती पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्युशी झुंजत होती आणि मी आप्तेष्टांच्या गराड्यात तिच्या जीवनासाठी प्रार्थना करत होतो. जीबी स्टोनचं पर्यवसान सडन किडनी फेल्युअर मध्ये झालं होतं.ती ज्या अवस्थेत होती त्यात दोन पैकी एक रुग्ण दगावतो, याची कल्पना डॉक्टरांनी दिली होती. अंततः त्या कठीण काळातून आम्ही सुखरुप बाहेर पडलो पण आमूलाग्र परीवर्तन होऊनच. 

भरभरून दिलं त्या आकस्मिक घटनेनं. एक नवं बळ दिलं, नवी द्रुष्टी दिली. प्रत्येक क्षण जगणं म्हणजे काय हे शिकवलं. दोघांपैकी कुणीही एक घराबाहेर पडतांना घेतलेला निरोप शेवटचा असू शकतो ही जाणीव दिली. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास या शब्दांचा खरा अर्थ समजावून सांगितला. द्वेष, दुस्वास आणि दांभिकता यांचा फोलपणा दर्शवला. शब्द अपुरे पडताहेत. भरभरून ​मिळालं. ​

प्रत्येक क्षण जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. भूतकाळाचे संदर्भ नाहीत आणि भविष्याची चिंता नाही. मजा येतेय.   

​​'तुम्हाला काय वाटतं?' विषयी
अश्याच एका प्रामाणिक क्षणी वाटलं की तुमच्याशी संवाद साधावा. माझे अनुभव आणि विचार तुम्हाला सांगावेत, तुमचे ऐकावेत, चर्चा करावी आणि प्रसंगी वाद सुद्धा घालावा! उद्देश एकच, पटलेलं सगळं आचरणात आणून जीवन जास्त जिवंत व्हावं. सगळ्यांचं.  

खरं तर सगळ्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात. कळतं पण वळत नाही हे आपण कंटाळा येईपर्यंत ऐकत असतो. वळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु आपण. माहीत असणं, बुद्धीला पटणं, आकलन होणं वगैरे सगळं ठीक आहे पण त्यानुसार वागण्याची धमक दाखवली नाही तर काय अर्थ? मी स्वतः अमुक व्यक्तीचा व्यासंग खूप आहे, अमुक इतके विचारवंत वाचले आहेत, स्मरणशक्ती दांडगी आहे, साहित्य मुखोद्गत आहे, इतके टक्के गुण मिळाले, इतक्या किमतीचा व्यवसाय आहे, अमुक हुद्यावर आहे असल्या विशेषणांनी मुळीच प्रभावित होत नाही. दैनंदिन जीवनात अमुक एक व्यक्ती कशी वागते, तिचं इतरांशी आचरण कसं आहे, ती जे बोलते ते करते का इत्यादी गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. तुम्हाला काय वाटतं?                            

मला असही वाटतं की आपण ​दांभिकता सोडायला हवी. अभय व्हायला हवं. जगण्याचं किंवा 
मृत्युचं​, भय हवय कशाला?​ जन्म आणि मृत्यु या दरम्यान जे जे घडतं त्या सगळ्याबद्दल बोलु आपण. नुसतं बोलुच नाही तर त्याप्रमाणे वागु. प्रेमावर बोलण्यापेक्षा प्रेम करणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
   
बरं,थांबतो आता. किती अंत पहायचा? पण घाबरु नका. सुरुवातीला ओळख होणं आवश्यक होतं म्हणून लांबलं जरा. पुढे प्रत्येकवेळी वेळेवर आवरतं घेतलं जाईल याची खात्री बाळगा. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांकडेच वेळ कमी असतो याची कल्पना आहे मला. तरीही काढा थोडा वेळ आणि जसं जमेल तसं जरुर कळवा मला की तुम्हाला काय वाटतं. माझा पत्ता: chandravel.foundation@gmail.com      

- चंद्रशेखर वेलणकर 
================
जाता जाता…  

विवेकानंद वाचताना एक गोष्ट मनावर कोरली गेली. 'गीता' या विषयावर बोलतांना ते म्हणाले होते की दोन ओळी अशा आहेत की ज्यांत संपूर्ण गीतेचं सार आहे.

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ  नैतत्त्वय्युपपद्यते 
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप​

त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "If you, my sons, can proclaim this message to the world - क्लैब्यं मा स्म गमः पार्थ  नैतत्त्वय्युपपद्यते - then all this disease, grief, sin, and sorrow will vanish from off the face of the earth in three days. All these ideas of weakness will be nowhere."  (ज्यांना अधीक जाणून घेण्यात रस आहे ते  http://www.swamivivekanandaquotes.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.)
 
('जाता जाता…'  साठी तुमच्या जवळ काही सांगण्यासारखं असेल तर सुमारे शंभर शब्दांत पाठवा)

8 comments:

  1. Dear Kaka,
    Really, 'Well Said'. Nice to know that you are a very good writer of Marathi also. Shall definitely keep visiting your blog.
    Regards,
    Kartik

    ReplyDelete
  2. Dear shekhar,
    मराठीतच लिहीते,
    आयुष्य हे जगण्यासाठीच असते, त्याकडे पाठ फिरवणारे पलायनवादी असतात. जे होणार ते होणारच, फक्त आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा ठेवायचा हे आपल्या ङातात असतं.
    खंबीरपणा लहानपणापासुन आपल्या रक्तात आहे. तो फक्त डळमळु द्यायचा नाही..
    बाकी लिखाणं उत्तम आहेच..keep writting..
    God bless you

    ReplyDelete
  3. प्रिय प्रसन्ना, नेमक्या शब्दात मांडलं तू. खरं आहे, we are not the ones to ever give up... lets try live in totality.. I remember Bhausaheb Patankar. ना रडू नुसतेच येथे, हाय ना नुसते करू; आहो शीवाचे भक्त आम्ही, हे ही करू, ते ही करू.... Thanks for encouragement.

    ReplyDelete
  4. Hello sir!

    Excellent! इथे तुझी‌ बॅटिंग अगदीच अनकन्व्हेन्शनल पण तितकीच भन्नाट सुरू आहे! आणि मला एक गोष्ट फार फार आवडली की, सेहवाग ज्याप्रमाणे बॉलरचं प्रेस्टिज चुलीवर टाकतो, तसा तू औपचारिकतेचा बुरखा टरा टरा फाडला आहेस! अगदी उत्स्फूर्त; बिलकुल आर पार इस छोर से उस छोर तक असं लिहिलं आहेस! Cheers and waiting for many more.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Niranjan....या विषयावर साधक-बाधक चर्चा व्हावी असं मला मनापासून वाटतंय. विचारांती योग्य ते आचरणात आणण्याचं धाडस मात्र दाखवावं लागणार आपणा सर्वांना….

      Delete
  5. शेखर किती छान लिहितोस रे तू। छान वाटल वाचुन ।एक विचारते की 'एकत्र असण आणि नवरा बायको नसण हे किती फायद्याचा असत हे तू ब्लॉग वर लिहावस काय अर्थ आहे। कोणाच्या व्यक्तिगत नात्या बद्दल इतरांना कलाव असा मला माहि वाटत। ह्या बद्दल ज़रा स्पष्टीकरण दे

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Praneeta for your comment. इथे मला नाते नाही तर मानसीकता अपेक्षीत आहे. नात्यांचे stereotypes नसले की व्यक्ती म्हणून सुद्धा आपण फुलत जातो. नाते तर फुलतेच. मेल वर विस्ताराने बोलू.

      Delete