बाबा: काय रे, कसला विचार करतोयस?
बाळू: सांग ना, आपला जन्म कशाकरता झालाय? शाळेत लिहून न्यायचंय मला.
बाबा: सोप्पं आहे. आपला जन्म इतरांची मदत करण्यासाठी
झालाय.
बाळू: पण मग इतरांचा जन्म कशाकरता झालाय? मदत करून घ्यायला?
बाबा: :-/
बाळूची शंका
त्याच्या वयाला साजेशी आहे. आपला जन्म जर इतरांची मदत करण्यासाठी
झालाय तर साहजिकच इतरांचा जन्म आपली मदत करण्याकरता झालाय. मग एकमेकांनी एकमेकांची मदत करण्यापेक्षा प्रत्येकानं स्वतःची मदत करणं सयुक्तिक, जास्त सोपं नाही का?
यातील विनोद
सोडून देऊ पण वरील संवाद नव्या पिढीच्या दृष्टिकोनावर भाष्य करतो. कोणे एके काळी
मुलं-मुली आई-बाबांचा शब्द प्रमाण मानून कुठलीही शंका उपस्थित न करता सांगितलेल्या
गोष्टी निमूटपणे अनुसरत असतीलही; प्रसंगी मन मारून सुद्धा. पण काळ बदललाय, पिढी बदललीय, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ज्ञान मिळवण्याच्या संधी आणि ते मिळवण्याची साधनं वाढली आहेत. परिणामस्वरूप, मुलांची ग्रहणशक्ती वाढलीय, बुद्धी तल्लख झालीय आणि त्यांचा विचार जास्त बुद्धिनिष्ठ आणि तर्कशुद्ध झालाय. या सगळ्याची दुसरी
बाजूही आहे पण त्याचा विचार आपण नंतर करू. इथं एक लक्षात घ्यायला हवं की आजच्या आई-बाबांना ते पाल्यांना सांगत असलेल्या प्रत्त्येक गोष्टीचं पटणारं स्पष्टीकरण देणं आवश्यक झालंय. कुठलीही गोष्ट पूर्णपणे पटल्याशिवाय पाल्य ती ऐकतील अशी अपेक्षा करता येणार नाही.
मला वाटतं, होणारा बदल चांगला अथवा वाईट याचा काथ्याकुट करण्यात अर्थ नाही. बदल मुद्दाच नाही कारण उत्क्रांतीचा, क्रमविकासाचा (evolution) तो एक अविभाज्य व टाळता न येणारा भाग आहे. बदल आपण थांबवू शकत नाही. तसं करणं निसर्गाविरुद्ध जाणं होईल. आपण एवढं मात्र निश्चितपणे करू शकतो की स्वतःला क्रमाविकासाच्या श्रेणीत
योग्य स्थानी नेऊ शकतो. क्रमविकसित पिढीशी जुळवून घेऊ
शकतो. आपल्या आधीच्या पिढीनं ते केल की केलं नाही
हा वादाचा विषय होऊ शकेल पण आपण ते करावं याबद्दल दुमत असणार नाही. तुम्हाला काय वाटतं?
काळ खरंच बदललाय. शिक्षक बाळूला म्हणाले, ''बाळ्या, साधं मराठी धड वाचता येत नाही तुला! तुझ्या वयाचे असतांना ज्ञानेश्वरांनी
ज्ञानेश्वरी लिहिली होती.'' बाळू शांतपणे त्यांच्याकडे बघत म्हणाला, ''सर. तुमच्या वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. घडतं असंही.'' तेंव्हा, पाल्यांना काहीही सांगायचं असेल तर पालकांना आधी ते स्वतः करण्यावाचून गत्यंतर नाही. तसं झालं नाही तर थेट प्रश्न विचारले जातील. पालकांनो, मनाची तयारी करा, उत्तरं तयार ठेवा!
खाण्यापिण्याच्या
सवयी, नियमित व्यायामाची गरज, सोशल मिडिया किंवा मोबाईल फोनचा योग्य वापर, शिस्त आणि अनुशासन, टीव्ही अथवा कॉम्प्यूटरच्या आहारी न जाणं; या आणि अन्य कुठल्याही विषयाशी संबंधित शिकवण तुम्ही देणार असाल तर तुम्ही स्वतः त्या शिकवणीनुसार वागता का हे नुसतंच जोखलं जाईल असं नव्हे तर त्याबद्दल विचारणा देखील होईल. प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली जाईल. पालकांनो, तपासणीला तयार राहा!
योग्य
संस्कारांच्या दृष्टीने कन्सेप्शनचा क्षण किती जागृत आणि जागरुक असतो हे महत्वाचं ठरतं हे आपण पाहिलंय. ती जागृती आणि जागरुकता त्या क्षणी होती का? हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं याचीही आपल्याला कल्पना आहे. जीवनाशी निगडीत आणखी एका अवघड प्रश्नासाठी तयार रहा. 'मला जन्म
देण्यामागे काय विचार होता?' या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं स्वतःला देऊन चालणार नाही तर ते पाल्यांना द्यावं लागेल.
या घडीला
तुम्हाला कदाचित हे पटणार नाही पण खात्री बाळगा आज ना उद्या
हा प्रश्न जरूर विचारला जाईल. फार दूर नाही तो दिवस. कल्पना करा, तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणून मी हे जाणू इच्छितोय की 'मला जन्माला घालण्यामागे निश्चित उद्देश काय होता?' अर्थातच मला उत्तर अपेक्षित नाही. ते मागणं माझ्या
अधिकारातही नाही. मला इथं एवढंच म्हणायचंय की या प्रश्नाचं सुद्धा समाधानकारक उत्तर प्रत्येकाला देता यावं. 'तो निसर्गाचा नियम आहे', 'यालाच जीवन म्हणतात', 'ही जगरहाटी आहे', 'सगळ्यांनाच मुलं होतात तेंव्हा आम्हालाही
वाटलं मुल हवं', 'मुलं म्हातारपणी मोठा आधार असतात' किंवा तत्सम उत्तरं स्वीकारली जाणार नाहीत.
अशा प्रत्येक
उत्तरानंतर प्रश्नांची एक मालिकाच सुरु होईल. उदाहरणार्थ, तो निसर्गाचा नियम आहे तर निसर्गाचे सगळेच नियम आपण पाळतो
का? मग हाच का पाळायचा आणि अन्य काही का पाळायचे नाहीत? आपल्या सोयीनुसार नियम पाळायचे असतात का? इत्यादी इत्यादी! मला वाटतं अशा भंपक उत्तरांपेक्षा 'मला खरंच कल्पना नाही. ठोस असा काहीच विचार नव्हता' असं प्रामाणिक उत्तर एकवेळ मान्य केलं जाईल. तुम्हाला काय वाटतं?
वर आपण स्वतःला क्रमाविकासाच्या श्रेणीत योग्य स्थानी नेण्याबद्दल बोललो. ते सहज शक्य
आहे. कसं?
शिक्षक: बाळू, तुझ्या बाबांचं वय काय?
बाळू: तो माझ्याच वयाचा आहे.
शिक्षक: काय बोलतोस! हे कसं शक्य आहे?
बाळू: सर, माझा जन्म झाल्यावरच तो बाबा झाला. बाबा
म्हणून तो माझ्या एवढाच आहे.
मला वाटतं, पाल्यांबरोबर पालकांना पुन्हा एकदा मोठं व्हायची संधी मिळते. अमुल्य आहे ही
संधी. तिचं सोनं करता येऊ शकतं. एक काळजी घ्यावी लागेल हे करताना. कुठल्याही
परिस्थितीत असं घडायला नको की त्यांच्यासोबत पुन्हा वाढतांना
आपल्याही नकळत आपली अपूर्ण स्वप्नं आपण त्यांच्यामार्फत
पूर्ण करायला पाहतोय. डोळ्यात तेल घालून याकडे लक्ष द्यायला हवं. या उलट, त्यांची स्वप्नं आपल्या डोळ्यात वसवली की आपलं काम झालंच म्हणून समजा.
मला वाटतं,त्यांची नुसती
स्वप्नंच आपल्या डोळ्यात येणार नाहीत तर सोबत ती त्यांचा
दृष्टीकोनही घेऊन येतील. नव्या पिढीच्या स्वप्नांकरता आपले डोळे आणि त्यांच्या
दृष्टीकोनाला सामावून घेण्याकरता आपलं काळीज आपण देऊ केलं तर आपण नव्याने जन्माला
येउन त्या पिढीशी एकरूप होऊ शकू. तुम्हाला काय वाटतं?
जरूर सांगा. माझा पत्ता: chandravel.foundation@gmail.com
- चंद्रशेखर वेलणकर
No comments:
Post a Comment