व्यक्त
व्हायचं असतं त्यांना. डोक्यात गोंधळ उडालेला असतो. 'आई-बाबा का
असे वागतात? इतर कुणाबद्दल तक्रार असती तर त्यांच्याकडे केली असती; पण त्यांच्याच काही गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत हे त्यांनाच कसं सांगू? आणि वेळ तरी कुठे असतो त्यांच्याकडे?' या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. कोंडमारा होत असतो, घुसमट होत असते. ही भावनिक उलथापालथ घडत असताना घरातून आधार मिळत
नसल्याची खंतही असते मनात. पण मन मोकळं करायचं कुणाजवळ, हे मात्र कळत नसतं. 'मला कुणी समजूनच घेत नाही. कुणालाच माझी काळजी नाही' अशा निष्कर्षाप्रत अनेक जण आलेले असतात. पालकांच्या वाढत्या अपेक्षांचं दडपण आणि त्या
अपेक्षांना आपण न्याय देऊ शकू की नाही या भावनेतून
निर्माण झालेली भीती असतेच सोबतीला. हे कमी म्हणूनच की काय, काही जणांवर पालकांनी धाकट्या भाऊ-बहिणीची जबाबदारी टाकलेली असते.
मुळात बिचाऱ्यांचं वय असं असतं की त्यांचीच कुणी काळजी घ्यावी! निराशा, थकवा, एकटेपणा सगळं बालवयातच अनुभवायला मिळतं त्यांना. आणि अपेक्षा तरी काय असतात त्यांच्या? कुणीतरी त्यांना वेळ द्यावा, एखादी गोष्ट सांगावी किंवा त्यांनी लिहिलेली लहानशी कविता ऐकून त्यांचं कौतुक करावं. बस्स!
हा माझा कयास किंवा कल्पनाविलास नाही; हे वास्तव आहे. प्रत्येक घरात हे घडतंच असं नाही पण अनेक घरांत या समस्या ठाण मांडून
बसल्या आहेत. आपण सगळ्यांनीचचाइल्डलाइन या संस्थेबद्दल ऐकलय. त्यांच्याजवळ असलेली माहिती केवळ धक्कादायकच नाही तर विषण्ण करणारी आहे. मी राहतो त्या
शहराबद्दल बोलायचं तर पुणे चाइल्डलाइन २००१ साली अस्तित्वात आली. संस्थेच्या दशकपूर्तीनंतर द टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना डॉ.अनुराधा सहस्रबुद्धे,संचालिका,पुणे चाइल्डलाइन,
म्हणाल्या
होत्या की पहिल्या वर्षी त्यांना दरमहा सरासरी १,५०० कॉल्स यायचे. तो आकडा दहा वर्षांनंतर दरमहा सरासरी २०,००० कॉल्स एवढा झाला! दोन दशकांनंतर ही संख्या
लाखात गेली तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचं फक्त उदाहरण दिलं. कमी-अधिक प्रमाणात ही समस्या
देशातील सगळ्याच शहरांना भेडसावतेय. आपल्या भावी
पिढीला याक्षणी आपली नितांत गरज आहे हे यांतून स्पष्ट होतं.
नव्या पिढीची ग्रहणशक्ती वाढलीय, बुद्धी तल्लख झालीय, तिचा विचार जास्त बुद्धिनिष्ठ आणि तर्कशुद्ध झालाय याबद्दल बोलत असताना आपण नमूद केलं होतं की या सगळ्याची दुसरी बाजूही आहे. हीच ती दुसरी
बाजू. एकीकडे त्यांचा बुद्ध्यांक (IQ) नवी शिखरं सर करत असताना भावनांक (EQ) मात्र खांद्याला खांदा लावून पुढे जाण्याच्या
स्थितीत नाहीये.
मला वाटतं, 'असली परिस्थिती माझ्या घरात नाही. इतर ठिकाणी होत
असेल असं पण माझ्या घरात? Impossible' असं म्हणणं सुज्ञपणाचं ठरणार नाही. आपण समाजात राहतो त्यामुळे कुठलीही समस्या एका कुटुंबापुरती
मर्यादित असूच शकत नाही. 'आमच्या मुलाचं/ मुलीचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्यात नाक खुपसू नका' असं कुणीही म्हणू शकत नाही. हा 'आमचा मुलगा/ मुलगी' समाजाचा एक भाग असतो. त्यानं किंवा तिनं शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निकोप असणं समाजाच्या हिताचं असतं. तेंव्हा, याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला. आपल्या घरात तसं घडत नसेलही पण कुठल्याच घरात ते घडू नये
यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं?
कन्सेप्शनचा क्षण फक्त दोन व्यक्तींचा नसून जन्माला येऊ घातलेली व्यक्तीसुद्धा त्या
क्षणाशी निगडीत असते हे विदित आहेच. ह्या व्यक्तीची पालकांमध्ये होणारी मानसिक आणि भावनिक गुंतवणूक त्या क्षणालाच सुरु होते. जन्मानंतर तिला आपली गुंतवणूक तोट्याची ठरतेय असं वाटू नये ही खबरदारी पालकांनाच घ्यायची
असते. मला खात्री आहे तुम्ही ती नक्कीच घेतली असेल, घेतही असाल. तरीही एक गोष्ट नाकारता येणार नाही की अनेक पालक ही
खबरदारी घेतांना दिसत नाहीत.
आपली चर्चा
गंभीर होत चाललीय याची मला कल्पना आहे. काय करणार? गंभीरच आहे विषय. काही पालकांची उदाहरणं पाहू. हा देखील माझा कयास किंवा कल्पनाविलास नाही; वास्तव आहे. खरं म्हणजे हे सांगायची आवश्यकता नाही कारण तुमच्या आजूबाजूला सुद्धा
अशी कुटुंबं तुम्हाला दिसतील.
पहिलं कुटुंब:
आई-बाबा दोघंही प्रचंड ओव्हरवेट. व्यायामाशी दुरान्वयानेही संबंध नाही. आम्ही 'सूर्यवंशी' आहोत असं ते कौतुकाने सांगत असतात कारण सूर्योदयाचा आणि
त्यांचा संबंध फक्त तो चित्रात पाहण्यापुरताच! दोघंही नोकरी
करतात. दोन मुलं; मोठा आठव्या आणि धाकटा पाचव्या वर्गात. स्वयंपाकाला, घरकामाला अर्थातच गडी पण त्यांचं आगमन हे घराबाहेर पडल्यावर होतं. आई स्वतःच्या आणि बाबाच्या डब्यापुरत्या पोळ्या करून घेते. मुलं आपलं आपण बघतात.
थोरल्यावर धाकट्याचं व्यवस्थित होतंय अथवा नाही हे पाहण्याची जबाबदारी असते. आई
जातांना सांगून जाते, ''भूक लागली तर बिस्किटं आणि चिप्स आहेत डब्यात. फ्रीज मध्ये चॉकलेट पण आहे.'' परवाच मी आई-बाबांना मुलांना व्यायाम आणि योग्य आहार याबद्दल उपदेश देतांना ऐकलं! मला वाटतं त्यांचा सल्ला मुलं सिरीयसली
घेणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं?
आपलं दुसरं
कुटुंब 'पॉप-अ-पिल' या तत्वावर नितांत श्रद्धा असलेलं! पोट साफ
नाहीये,घे गोळी; डोकं दुखतंय, घे गोळी; कणकण वाटतेय, जळजळतंय, कुठलीही बारीक-सारीक तक्रार असो तब्येतीची; घे गोळी! बाबा नोकरीला जातो, आई घरूनच काम करते.मोठी मुलगी नवव्या व धाकटा मुलगा चवथ्या वर्गात.बहुतांश सवयी पहिल्या कुटुंबाप्रमाणे. फरक एवढाच की आई-बाबा सोबत मुलंही ओव्हरवेट! 'आम्ही खात्या-पित्या घरचे आहोत' असं त्यांना म्हणतांना मी अनेकदा ऐकलय. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आई-बाबानी वजन कमी करायचं ठरवलंय. त्यांना एक असा मार्गही म्हणे मिळालाय ज्यानुसार काही आयुर्वेदिक औषधं घेऊन वजन कमी करता येतं. आहारात फारसा
आणि जीवनशैलीत मुळीच बदल न करता!! कसली-कसली चूर्णं, गोळ्या खात असतात चौघंही. परिणाम दिसत नाहीये अजून. मला वाटतं, आहारशैली आणि जीवनशैलीत योग्य ते बदल केले तर औषधाशिवाय अपेक्षित परिणाम कायमस्वरूपी मिळू शकेल. तुम्हाला काय वाटतं?
शेवटची दोन
उदाहरणं. बाबा अत्यंत बिझी. पैसा खूप कमावतो पण मुलांसाठीच्या वेळेचं
दारिद्र्य. आईला वेळ असतो पण मुलांना बाबाच हवा असतो. बाबाचं मन त्याला खात असावं कारण वेळ देऊ शकत नसल्याची उणीव तो मुलांना अद्यावत उपकरणं, सुखसुविधा आणि भरपूर पॉकेटमनी देऊन भरून
काढतो. पॉकेटमनीचा दुरुपयोग दिसायला लागलाय पण उशीर
झालाय आता. या पालकांच्या अगदी उलट हे चवथे आई-बाबा. स्वतः पैसा खर्च करत नाहीत, मुलांना करू देत नाहीत! उत्पन्न कमी आहे अशातलाही भाग नाही. मुलांना
मित्रांमध्ये वावरतांना कायम संकोच वाटत असतो कारण नेहमी टोमणे ऐकावे लागतात; पाकिटात कधीच हात न घालण्याबद्दल. परिणामतः मुलं सतत बंडाच्या पवित्र्यात. केंव्हाही जा, यांच्या घरात तलवारी उपसलेल्याच!
वरीलपैकी
कुठल्याही परिस्थितीत मुलांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ पालकांच्या
अपेक्षांनुसार व्हायची शक्यता कमी आहे. झालीच तर तो नियम सिद्ध करणारा अपवाद
ठरावा. मुळात मुलांना फक्त त्यांच्यासाठीचा वेळ, आश्वासक संवाद आणि प्रेमळ प्रतिसाद हवा असतो. आपल्या सोयीनं हे सगळं देणं योग्य नाही. त्यांना हवा तेंव्हा ते
मिळायला हवं. 'विकएंड फॉर्म्युला' इथे कामाचा नाही.
मला वाटतं, मुलांच्या भौतिक गरजांसोबत मानसिक आणि भावनिक गरजाही पूर्ण केल्या'च' जाव्यात याबद्दल आपण सगळ्यांनी बोलण्याची गरज आहे. जसं, जेंव्हा आणि जिथं शक्य होईल तसं, तेंव्हा आणि तिथं. इतरांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष घालणं अपेक्षित नाही आणि तसं करण्याचा आपला मानसही नाही. त्याचवेळी, भावी पिढीला आपली नितांत गरज आहे हे वास्तव नजरेआड करूनही चालणार नाही. ही पिढी सक्षम होणं सगळ्यांच्याच हिताचं आहे. आपल्या अत्यंत जवळच्या किंवा आपल्या शब्दाला किंमत
आहे अशा प्रत्येक कुटुंबात आपण याबद्दल निश्चितच बोलू शकतो. करू तसं. तुम्हाला काय वाटतं?
-
चंद्रशेखर
वेलणकर
(chandravel.foundation@gmail.com)
Great kaka. Good confrontation for all of us. Insightful. We need to really open our eyes.
ReplyDeleteThanks Niranjan.. We do need to open our eyes, ears, minds and above all, our hearts..
DeleteExtremely thought provoking
ReplyDeleteThanks Chinmay...
Delete