पालक-पाल्य
संबंध खरंच खूप महत्वाचे असतात. समाधानाची बाब म्हणजे मला चांगले पालक मिळाले.
आपले पालक आपणच निवडतो असाही एक शास्त्रीय विचार आहे. तो मान्य केला तर मी चांगले पालक निवडले! व्यायाम व इंग्रजी विषयाची आवड मला वडिलांकडून मिळाली आणि पाठांतर व अल्प प्रमाणात का
होईना, लिखाणाची कला, आईकडून आली. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे समर्थक होते. मी
मात्र त्या वाटेला कधीच गेलो नाही. पण त्यांनी 'तू शाखेत जात जा' असे सुचवल्याचेही मला स्मरत नाही; बळजबरी करणं दूरच. यामुळे इतरांच्या विचारांचा आपण आदर करावा आणि त्याचबरोबर आपल्याही मतांचा इतरांकडून आदर व्हावा ही भावना लहानपणीच रुजली. तसंच मतभेद असतांनाही मनभेद शिरकाव करू शकत नाही याचं बाळकडूही
मिळालं. हे सगळं मी का सांगतोय? या प्रश्नाचं उत्तर खाली मिळेल.
मी नागपूरला
असतांनाची गोष्ट आहे. एकदा दिवाळी दरम्यान माझ्या मामीच्या कुणा एका नातेवाइकाकडे कसलासा कार्यक्रम होता. मामा आणि त्याचं कुटुंब त्यासाठी परगावी गेलं होतं. जातांना तो मला सांगून
गेला होता की निदान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी माझ्या घरी पणत्या लावून जा आणि घरातील दिवे काही वेळ चालू ठेव. मला विचाराल तर 'दिवाळी' सण नसून मनाची अवस्था आहे. ती अवस्था जेंव्हा जेंव्हा असते तेंव्हा तेंव्हा मी दिवाळी साजरी करतो. याउलट, दिवाळीपूर्वी मी काही 'दिवे लावले' असतील तर दिवाळीला दिवे लावण्याच्या मनस्थितीत मी नसू शकतो! तरीही त्याच्या मतांचा आदर करून मी त्याला 'हो' म्हटलं.
ठरलेल्या
दिवशी काही व्यस्ततेमुळे दुपारी उशिरा घरी परतलो आणि धावपळीत फ्रेश होऊन मामाच्या घरी गेलो. माझ्या घरापासून त्याचं घर बरंच दूर होतं. दिवेलागणीपूर्वी त्याच्या
घरी पोचलो खरा पण शांत बसल्यावर भुकेची तीव्र जाणीव झाली. जवळच्या हॉटेलात काहीतरी खाऊन
यावं असा विचार केला आणि लक्षात आलं की वेळेवर पोचण्याच्या नादात पैशाचं पाकीट
घरीच विसरलो होतो. मामाकडे नियमित जाणं होत असल्यानं वरखर्चाचे पैसे कुठं असतात याची मला कल्पना होती. वापरावे का ते पैसे? मोबाईल फोन्स नव्हते त्या काळी आणि मामीच्या नातेवाइकाचा फोन नंबर मला माहित नव्हता त्यामुळे परवानगी मागणं शक्य नव्हतं.
एक मन म्हणालं, भूक तीव्र आहे, मान्य; पण काही न खाण्यामुळे जीव जाण्याची वेळ निश्चितच आलेली नाही. घरी परतल्यावर खा वाटेल तेवढं. दुसरं मन म्हणालं, कमाल आहे! चोरी करतो आहेस का? घे ते पैसे. घराची किल्ली आहेच तुझ्याजवळ. उद्या येउन ठेऊन दे
पैसे परत. शरीराला मात्र मनात चाललेल्या द्वंद्वाशी देणं-घेणं नव्हतं. त्याला खायला हवं होतं.
शेवटी मी दुसऱ्या मनाचं ऐकलं. पैसे घेतले आणि नंतर परतही ठेवले. तरीही माझी बुद्धी, माझा विवेक मला स्वस्थ बसू देईना. ''या प्रकारात वरवर पाहता काहीच चूक नाही पण कुणाचंही काहीही त्या व्यक्तीला न विचारता वापरणं योग्य नाही,'' माझा विवेक मला सांगत होता. मामा परतल्यावर
त्याचे पैसे परवानगीशिवाय वापरल्याचं त्याला सांगितल्यानंतरच बुद्धीची टोचणी गेली.
तुम्हालाही अशा आंतरिक संघर्षाचा अनुभव कधी ना कधी आलाच असेल नाही का?
ही घटना खूप
काही शिकवून गेली. एक व्यक्ती म्हणून असलेलं आपलं अस्तित्व शरीर, मन आणि बुद्धी या पातळींवर कसं निराळं करून पाहता येतं याचा प्रत्यय तर आलाच
पण या प्रत्येक पातळीवरील घडामोडी, समस्या आणि विकार यांचा आढावा, विश्लेषण आणि निराकरण त्याच पातळीवर करणं श्रेयस्कर नाही
याचीही जाणीव झाली. ज्या पातळीवर आपण अडचणींचा सामना करत असतो तिच्या वरच्या पातळीवर जाऊनच त्यांचं निराकरण शक्य होतं. पुढं सविस्तर बोलू
याबद्दल.
खोलात
शिरण्यापूर्वी एक विचारतो. आठवतंय ना आपल्या संवादाची सुरुवात कशी झालीय? जन्म आणि मृत्यू या दरम्यान जे जे घडतं त्या सगळ्याबद्दल आपण बोलायचं ठरवलंय आणि आपण नुसते बोलणारच नाही तर पटलेले विचार जीवनात आणून जीवन जास्त
जिवंत करणार आहोत हे सुद्धा ठरलंय. आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती, मानवी जीवनातील उपजत प्रेरणांपैकी आहार, निद्रा आणि भय यांच्याबरोबर मैथुनाला समान दर्जा मिळण्याची निकड; गर्भसंस्कार; पाल्यांसोबत पुन्हा एकवार मोठं होण्याची मिळणारी संधी; नव्या पिढीच्या स्वप्नांना आपले डोळे आणि त्या पिढीचा दृष्टीकोन सामावून घेण्याकरता आपलं काळीज देण्याची आवश्यकता तसंच पाल्यांच्या भौतिक गरजांसोबत मानसिक व भावनिक गरजाही पूर्ण केल्या'च' जाव्यात यासाठी जरुरी असणारे प्रयत्न यांबद्दल आपण आत्तापर्यंत बोललोय.
पुढं जातांना
एक विनंती. चर्चेदरम्यान आपण काही विशिष्ट संज्ञा वापरू पण त्यामुळे गोंधळून जायचं कारण नाही. कुठल्याही शास्त्राबद्दल बोलतांना त्या शास्त्राशी संबंधित टर्म्स आपल्याला वापराव्याच लागणार. त्यांचा कमीतकमी वापर करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. असो.
योगशास्त्र एक व्यक्ती म्हणून आपला विचार करतांना पाच कोशांत आपली विभागणी करतं:
अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. आपली चर्चा क्लिष्ट होऊ नये म्हणून आपण शरीर (अन्नमय
कोश), मन (मनोमय कोश) आणि बुद्धी, विवेक (विज्ञानमय कोश) हे शब्द वापरू. फिटनेस बद्दल बोलतांना प्राणमय कोशाचा परामर्श घेऊ. आनंदमय कोश मात्र अनुभवाचा
विषय आहे चर्चेचा नाही आणि त्यामुळे त्यावर मौन पाळणं उचित आहे असं मला वाटतं. आपलं 'चांगलं वाटणं' केवळ आपण स्वतःच अनुभवू शकतो.
आत्मा-परमात्मा
इत्यादीबद्दल सुद्धा मी भाष्य करणार नाही. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मला परमात्म्याचा
अनुभव नाही त्यामुळे परमात्मा आहे असं मी म्हणू शकत नाही. दुसरं, परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी मी सिरीयस प्रयत्न केलेला नाही त्यामुळे
परमात्मा नाही असं म्हणण्याचा मला अधिकार नाही. मला वाटतं, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही विषयावर काहीही बोलणं निरर्थक आहे. तुम्हाला काय वाटतं?
तुम्हाला आणि
मलाही, शरीर, मन आणि बुद्धी यांचा प्रत्यक्ष अनुभव असल्यानं शरीरस्वास्थ्य, मनःस्वास्थ्य आणि बुद्धी व विवेक यांचा शक्य तेवढा योग्य वापर यांबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्याचप्रमाणे, भ्रामक समजुती, दांभिकता आणि बुद्धीला पटत नसलेल्या गोष्टींचं केवळ सवयीनं अनुसरण करण्याची वृत्ती या सगळ्यांना प्रश्न विचारण्याचाही आपल्याला निश्चितच अधिकार आहे. आपण अधिकार गाजवू!
मला वाटतं, स्वस्थ शरीर, शांत मन आणि उत्तम विवेक इतकं जरी आपल्या हाती लागलं तरी पुरे झालं. या तिघांच्या परीपाकातून
निर्माण होणारी प्रसन्नता आपण अनुभवू, त्यातून उगम पावणारा आनंद लुटू आणि मिळणाऱ्या शांतीत न्हाऊन निघू. आत्मा आणि परमात्मा यांना स्वतःची चिंता स्वतः करू देऊ. तुम्हाला काय वाटतं?
-चंद्रशेखर वेलणकर
chandravel.foundation@gmail.com
तसंच मतभेद असतांनाही मनभेद शिरकाव करू शकत नाही.....
ReplyDeleteNicely worded. It shows how people with differences of opinion can live in harmony and it's essential for parent-child relationship
True.. In fact, it's essential for every relationship be it personal, professional, social and all.... I had some serious differences of opinion with parents but they never came in between our relationship as we always all agreed to differ..
ReplyDeleteसर, सडेतोड आणि लाजवाब!!
ReplyDeleteधन्यवाद निरंजन…
ReplyDelete