Friday, 19 December 2014

हे करून तर बघा…

स्वस्थ शरीर, सुद्रुढ मन आणि बुद्धिनिष्ठ विचार अर्थपूर्ण जीवनाची त्रिसूत्री आहे. 'यशस्वी जीवनाची त्रिसूत्रीमी म्हणत नाहीये. मला वाटतंयश अर्थपूर्ण असेलच असं नाही. यशाची कधीकधी इतकी किंमत आपण चुकवतो की ते निरर्थक वाटू लागतंतुम्हाला काय वाटतं? 

शरीरस्वास्थ्य, मनःस्वास्थ्य आणि उत्तम विवेक यांबद्दल बोलतांना एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःला शरीरमन आणि बुद्धी या पातळींवर निराळं करून पाहण्याचा प्रयत्न करू. तसंच प्रत्येक पातळीवरील संभाव्य कॉमन समस्या आणि त्यांचं निराकरण यांचीही चर्चा करू. 

एक महत्वाचा मुद्दा विचारात घेऊन पुढं जाऊ. वरील तीन पैकी कुठल्याही एका पातळीवर जेंव्हा अडचण येते तेंव्हा सामान्यतः त्याच पातळीवर आपण तिचं उत्तर शोधतो. हे नकळत घडतं. मला खात्री आहे, या चर्चेनंतर एका वेगळ्या दृष्टीकोनातून आपण या प्रक्रियेकडे पाहायला लागू. 

सुरुवात शरीरापासून करू. मन आणि बुद्धी सूक्ष्म असतात. एखाद्या व्यक्तीचं मन जाणायला, बुद्धीचा आवाका मोजायला आपल्याला त्या व्यक्तीचा अनुभव येणं गरजेचं असतं. शरीर साक्षात दिसतं. हेच बघा ना, आपण कुणालातरी ओझरतं भेटतो. नावांची देवाण-घेवाण होते. कालांतरानी त्या व्यक्तीचं नाव आपण विसरू शकतो पण तिला भेटलोय या विषयी आपल्या मनात संभ्रम नसतो. काही वर्षांनंतर त्या व्यक्तीचा चेहराही कदाचित आपण डोळ्यासमोर आणू शकणार नाही पण ती व्यक्ती स्त्री होती का पुरुष (तुम्ही कितीही सांगा, मी स्त्री-पुरुषांकडे सारख्याच नजरेनं बघतो/ बघते!!!), उंच होती का ठेंगणी, बारीक होती का जाड हे आपण विसरत नाही. मुद्दा काय की पहिली पातळी शरीराची. त्याबद्दल आधी बोलू. 

वजन वाढत चाललंय, कमी कसं करायचं? शरीराच्या पातळीवर आपल्यापैकी बहुतेकांना पडणारा हा प्रश्न आहे. वाढत्या वजनाचं कारण शोधणं म्हणजे रॉकेट सायन्स नाही. खाणं शरीराच्या गरजेपेक्षा जास्त होतंय हे उघड असतं. आपण काय करतो? खाण्यावर नियंत्रण आणतो; प्रसंगी मन मारून! एवढा आटापिटा का? असं कुणी विचारलं तर 'Extraordinary problems need extraordinary solutions' असली पल्लेदार वाक्यं टाकतो!! काही महिने जातात आणि अपेक्षित परिणाम दिसू लागतात. हुश्श! आता एखादवेळी मनाप्रमाणे वागायला हरकत नाही असं आपण स्वतःला सांगू लागतो. हळूहळू रोजच पाहिल्याप्रमाणे वागू लागतो दिसू लागलेले परिणाम दिसेनासे होऊ लागतात!!! पुन्हा आपण म्हणतो, वजन वाढत चाललंय, कमी कसं करायचं? 

आणखी दोन नेहमीचे अनुभव. जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा यांची बहुदा वाट लागलेली असते. आम्लपित्त होतं. घशात जळजळ असते, खाण्याची इच्छा नसते. आपण काय करतो? एन्टेसिड घेतो. जळजळ थांबते, भुकेची जाणीव होते. हुश्श! चारदोन दिवसांनी तोच त्रास, पुन्हा एन्टेसिड! काहीजण तर सवयीनं गोळी घेऊन नंतरच जेवतात. हायपरटेंशनची कथा तशीच. वाढलेलं ब्लड प्रेशर आपण गोळ्या खाऊन नियंत्रणात ठेवतो. गोळी चुकली की बी.पी. गेलंच वर.          

या तीनही प्रकारात काय होतंय? शरीराच्या पातळीवर समस्या आहेत आणि त्याच पातळीवर आपण उत्तरं शोधतोय. जास्त ऐवजी कमी खाऊन, एसिडीटी साठी एन्टेसिड घेऊन, रक्तदाब वाढण्याची कारणं विचारात घेता औषधाच्या सहाय्याने तो काबूत ठेऊन समस्यांचं निराकरण करू पाहतोय. उत्तरं शोधण्याचे असे सगळे प्रयत्न विफल होणार हे निश्चित. करायचं काय मग? 

ह्या समस्या सोडवायला मनाच्या पातळीवर जायला हवं. मनाच्या हव्यासापोटी शरीराला त्रास भोगावा लागणं बरोबर नाही. मनाशी संवाद साधून त्याला विश्वासात घेणं गरजेचं आहे. बळजबरी कुठंच नकोय आपल्याला. त्यामुळे इच्छा दडपून वा मन मारून नव्हे तर मनाला आपलंसं करून, त्याला वळण लावून योग्य आहारशैली आणि जीवनशैली आचरणात आणायला हवी. यांत यशस्वी झाल्यावर शारीरिक तक्रारी संपल्याच म्हणून समजा. 

आता मनाबद्दल बोलू. इच्छा-आकांक्षा, भाव-भावना, स्वप्न-ध्येय-उद्दिष्टं; मनाच्या छटा असंख्य असतात. एकत्रितपणे ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनावर जो परिणाम होतो त्याबद्दल मी नव्याने काही सांगण्याची आवश्यकता आहे? तुम्हाला याचा फर्स्ट-हँड अनुभव आहे. ताण-तणाव जीवनाचा नियम आणि तणावमुक्त जीवन आता अपवाद झालाय. 'नेसेसरी इव्हील्स' जीवनात स्वीकारून तारेवरची कसरत करतांना मनाविरुद्ध वागणं गरजेचं मनासारखं वागायला मिळणं चैनीचं होऊ पहातंय.
                                                                 
मी नव्यानं खरंच काय सांगणार तुम्हाला? व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक अशा सगळ्या आघाड्या नेटानं सांभाळणं, सगळ्या लोकांच्या सगळ्याच अपेक्षांना न्याय देणं आणि हे सगळं करत असतांना सगळ्या संबंधितांना खुश ठेवणं काय असतं तुम्ही जाणता. गरीब बिचारं मन या प्रचंड ओझ्याखाली दबून घुसमटलं नाही तरच नवल! 

हे दडपण असह्य होवून मन सैरभैर होतं आणि त्याचे परिणाम सायकोसोमेटिक व्याधींच्या रूपानी आपल्या शरीराला ग्रासतात. तुम्हालाही कल्पना असेल की वैद्यक शास्त्रानुसार जवळपास ७० टक्के शारीरिक व्याधी सायकोसोमेटिक असतातमनाचे दुष्परिणाम जसे शरीरावर होत असतात तसेच अस्वस्थ शरीराचे मनावर होतात. आपला अनुभव आहे की झोप कमी झाली किंवा अजिबात झालीच नाही तर मनालाही मरगळ येते. ही सोमेटोसायकिक प्रक्रिया मनाला आणखी खोल गर्तेत ढकलते. एक दुष्टचक्र आहे हे. तात्पर्य काय की निरोगी आणि सुद्रुढ मन अर्थपूर्ण जीवनाची एक मुलभूत गरज आहे.

अपेक्षांचं ओझं, काळजी, चिंता, दडपण, तणाव इत्यादींपासून सुटकारा मिळवण्याकरता मन कुठेतरी रमवणं गरजेचं असतं. मनःशांतीसाठी लोक आपआपल्या परीनं प्रयत्न करतात. पण सामान्यतः जे शरीराच्या बाबतीत होतं तेच मनाच्या बाबतीतही घडतं. कसं?

एक व्यक्ती मनाला इतरत्र गुंतवण्यासाठी संगीताचा आस्वाद घेते, दुसरी नाटक-सिनेमात गुंगते, तिसरी वाचनात रमते, चौथी खेळात-व्यायामात आनंद घेते, पाचवी पूजा-भजन-पारायणं यांत रममाण होते, सहावी एखादा छंद जोपासते आणि सातवी कदाचित व्यसनात काळजी, चिंता, तणाव इत्यादींना विसरण्याचा प्रयत्न करतेएक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. आपल्याला असं सुचवायचं नाहीये की पूजा-भजन-पारायणं आणि दारू पिणं यांत काहीच फरक नाही! हे यासाठी अधोरेखित करतोय की कुणीही एकाएकी अशा निर्णयाप्रत येऊ नयेआवडणारं संगीत, उत्तम करमणूक, दर्जेदार वाचन, कसदार खेळ, सर्जनशील लेखन, सात्विक भजन-कीर्तन आणि आनंददायी छंद मनाला तजेला देतात याउलट व्यसनं आपला घात करतात. परंतु समान भूमीवर आणून आपण या सगळ्यांचा एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करूया.  

वरील सातही बाबतीत काय होतंय? मनाच्या पातळीवर समस्या आहेत आणि त्याच पातळीवर उत्तरं शोधली जात आहेत. काळानुरूप उदाहरण घेऊ. कल्पना करा की मन एक हार्ड डिस्क आहे. जीवनाच्या धकाधकीत अपेक्षांचं ओझं, काळजी, चिंता, दडपण आणि तणाव ह्या नकारात्मक फाईल्स त्यामध्ये स्टोअर झाल्या आहेत. आपण काय करतो? समतोल साधण्याकरता काही सकारात्मक फाईल्स हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करतो. त्या सकारात्मक असल्यामुळे निश्चितच स्टोअर करण्याची प्रक्रिया प्रसन्न करणारी असते. पण अप्रसन्न करणाऱ्या फाईल्स डिलीट कुठं झाल्या आहेत? त्या आहेतच. त्यांना डिलीट केल्याशिवाय, निदान त्यांचा साईझ कमी केल्याशिवाय उत्तरं शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होतील ही अपेक्षाच व्यर्थ आहे. करायचं काय मग?     
   
मनाच्या समस्या सोडवायला बुद्धीच्या पातळीवर जायला हवं. आपला विवेक वापरून काळजी, चिंता, दडपण, तणाव इत्यादींना जन्म देणाऱ्या कारणांचा शोध घ्यायला हवा. त्यांना शोधून समूळ नष्ट केलं म्हणजे मनःस्वास्थ्याचा मार्ग मोकळा झालाच म्हणून समजा. हे साधलं तर सकारात्मक फाईल्स स्टोअर करण्याची गरजही कमी होईल. 

शांत मन म्हणजे तर कोरी हार्ड डिस्क; कुठल्याच फाईल्स नाहीत, ना नकारात्मक, ना सकारात्मक. शांत मनाचा अनुभव कदाचित क्वचितच येईल पण तो अवर्णनीय असेल. अनुभव आहे तो; आपला आपल्यालाच घ्यावा लागेल. 

मला वाटतं, बुद्धीचा, विवेकाचा योग्य वापर करून सकारात्मक फाईल्स असलेलं सुद्रुढ मन घडवणं त्यायोगे स्वस्थ शरीर कमावणं सुद्धा छोटी उपलब्धी नाही. प्रत्येकानं आपल्या आवडी-निवडीनुसार हा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करावा. 

सकारात्मकता अंगी बाणवण्याची कुठलीही पद्धत श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. पोथ्या-पुराणं श्रद्धेनं वाचणारा महान आणि सत्यजित रे निष्ठेनं बघणारा लहान असं काही नसतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा गैरसमज बाळगणारे अनेकजण भेटतात. मला वाटतं, दिल्ली गाठणं महत्वाचं; विमानानं जा, ट्रेननं प्रवास करा, बसमध्ये चढा की पदयात्रा करातुम्हाला काय वाटतं? 

- चंद्रशेखर वेलणकर           
chandravel.foundation@gmail.com

4 comments:

  1. यथार्थ, समर्पक!!!

    ReplyDelete
  2. खरे आहे! 'मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ।।' ही उक्ती म्हणजे केवळ अध्यात्माशी निगडीत नसून दैनंदिन व्यवहारातदेखिल तितकीच उपयुक्त आहे.
    आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी कुणी काहीही करू शकतं. 'आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं। सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति ।।'
    याचा अर्थ : आकाशातूना पडलेले पाणी जसे काहीही करून सगरालाच जावून मिळते, तसे कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार केशवाला पोहोचतो.
    पण इथे मला शब्दश: अर्थ अभिप्रेत नाहीये. याचा अर्थ 'कुणी काहीही करा, आनंद मिळविणे अंतिम ध्येय' असाही घेता येतो.
    परंतू ही अवस्था फार पूर्वीदेखिल आली होती. भगवान बुद्धाच्या काळात 'चार्वाक' नावाचा तत्त्ववेत्ता होवून गेला अथवा तदनामक तत्त्वप्रणाली होवून गेली. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे होते :
    जोवर जीवन आहे, तोवर जगा. ऋण काढून तूप प्या. मेल्यानंतर काहीही शिल्लक रहात नाही. हिच प्रनाली पुढे वज्रयान बौद्धांमध्ये विकृत झाली आणि अनैतिकतेला ऊत आला. पुढे त्या मतप्र्णालीला आळा बसला हे सांगायला नकोच! थोडक्यात काय, की, जीवनाचा आनंद घेणे महत्वाचे, पण त्यातून समाजाला, किंवा समाजघटकाला काही नुकसान तर होता नाहीये ना, याची खात्री करून घेणेही क्रमप्राप्तच आहे.
    जीवनाचा आनंद कोणत्याही वस्तूच्या असण्या-नसण्यावर अवलंबून नसून हा अस्तित्त्वाचा आनंद आहे असे म्हणतात, तो काय आहे हे ज्याचे त्याने शोधणे गरजेचे! कारण जिथे शब्द तोकडे पडतात, तिथे अनुभूती बोलू लागते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर योगेश. 'परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनं' हे कायम ध्यानात असणं गरजेचं आहे. आणि खरय, 'चांगलं वाटणं' आपलं आपणच अनुभवावं लागतं आणि त्यासाठी प्रयास आपला आपणालाच करावा लागतो.
      चार्वाकांचं एक काँन्ट्रीब्युशन मात्र मोलाचं आहे. त्यांच्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासल्या गेली आणि बराच साचलेल्या प्रतिरोधक गोष्टी बाजूला सारून प्रवाह पुन्हा वाहता करता आला.
      अनेकांची चूक कोठे होते? 'सर्व देव नमस्कार:… ' असं म्हणतांना ते 'नमस्कार' करण्याची माझीच पद्धत फक्त योग्य हे ठासवून सांगतात! तेवढं टाळून नमस्काराच्या सगळ्याच (केवळ धार्मिक किंवा तात्विक नाही) पद्धती मान्य केल्या की कोकिळेचं गाणं सुद्धा नमस्कार आहे हे उमजू लागतं.
      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

      Delete